वयाच्या पंचविशीत जवळपास २० देशांचा प्रवास. वार्षिक २० लाख रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी. मात्र, काही काळासाठी हे सर्व बाजूला ठेवून उच्च शिक्षणासाठी झेप घेण्यास तेजल अभय शहापूरकर ही उस्मानाबादकर तरुणी सज्ज झाली आहे. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात हे शिक्षण घेणारी जिल्हय़ातील ती पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे.
तेजलने आतापर्यंत वीसहून अधिक देशांमध्ये सहल म्हणून नव्हे, तर कामाचा भाग म्हणून प्रवास केला. जगभरातील विविध विद्यापीठांमध्ये जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यातील अनेकजण व्यवसाय व नोकरीनिमित्त परदेशात स्थायिकही झाले आहेत. मात्र, तेजलची गोष्टच वेगळी. वार्षिक २० लाख रुपये पगाराची नोकरी सोडून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात तिने अलीकडेच प्रवेश घेतला. ‘हार्वर्ड’मध्ये शिक्षणासाठी जिल्हय़ातून सर्वप्रथम व स्वकर्तृत्वावर जाण्याची कामगिरी तिने करून दाखविली. तेजलचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण पालिकेच्या शाळेत झाले. छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून दहावीची परीक्षा देताना राज्यात १९वा क्रमांक प्राप्त केलेल्या तेजलचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे एमआयटीत पूर्ण झाले. कॅम्पस मुलाखतीतच जागतिक पातळीवरील ‘शेल’ या पेट्रोलियम कंपनीमध्ये तिची निवड झाली. या कंपनीच्या माध्यमातूनच तेजलला नेदरलँड्स, दुबई, मलेशिया, नायजेरियासह अनेक देशांमध्ये जाण्याची संधी मिळाली.
सामाजिक अभिसरणात सातत्याने भरीव योगदान देणाऱ्या डॉ. अभय व डॉ. स्मिता शहापूरकर या दाम्पत्याची तेजल ही मुलगी. आई-वडील व्यवसायाने डॉक्टर असताना वैद्यकीय क्षेत्रात न जाता स्वत:च्या आवडीने पेट्रोलियम इंजिनिअिरग क्षेत्र निवडून यात झेप घेतली. जागतिक पातळीवर विविध कंपन्यांमध्ये घडणारी स्थित्यंतरे समजून घेऊन त्याचा अभ्यास करण्यासाठीच तिने हार्वर्ड विद्यापीठात दोन वर्षांचा एमबीए अभ्यासक्रम करण्यासाठी प्रवेश घेतला आहे.
आपल्याजवळ आहे तेवढय़ावरच न थांबता जमेल तसे जमेल तेथे देशात अथवा देशाबाहेर प्रवास करावा. त्यामुळे आपल्या क्षमता व आपल्याला कोणत्या संधी खुणावत आहेत हे कळते. त्यासाठी विस्तारित दृष्टिकोनातून जगाकडे पाहायला हवे, असे तेजल आवर्जून सांगते.