एकेकाळी दाऊद, छोटा राजन अशा गुंड टोळ्यांच्या प्रमुख म्होरक्यांकडून खंडणीसाठी थेट दूरध्वनी येत असत. त्यामुळे भल्याभल्यांची गाळण उडत असे. मात्र मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबईतील संघटित गुन्हेगारीचा कणा मोडल्यानंतर खंडणीसाठी येणाऱ्या दूरध्वनींमध्ये कमालीची घट झाली होती. परंतु आता पुन्हा खंडणीसाठी दूरध्वनी येऊ लागले असून आता हे म्होरके नव्हे तर त्यांचे ‘सहाय्यक’ खंडणीसाठी दूरध्वनी करीत असल्याचे दिसून येते.  
म्होरके झाल्यानंतर थेट दूरध्वनी करणे कमीपणाचे वाटत असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सहाय्यकामार्फत खंडणीसाठी दूरध्वनी केले जाऊ लागले आहेत. यापैकी काही सहाय्यक स्वत:च म्होरके झाले आहेत. काल- परवापर्यंत रवी पुजारी हा एकेकाळचा छोटा राजन टोळीतील गुंड स्वत:च खंडणीसाठी दूरध्वनी करून धमक्या द्यायचा. मात्र आता तो स्वत:ला म्होरक्या समजू लागल्याने त्यानेही या कामासाठी ‘सहाय्यक’ ठेवल्याचे अशोक देवाडिगा याच्या अटकेनंतर स्पष्ट झाले आहे. देवाडिगाला भारताच्या हवाली करण्यात आल्यानंतर या बाबीवर प्रकाशझोत टाकला आहे. देवाडिगा हा आपण रवी पुजारी असल्याचेच सांगून खंडणीसाठी धमक्या देत असल्याचे स्पष्ट झाले होते.
दाऊदच्या वतीने सुरुवातीला छोटा शकीलच दूरध्वनी करीत असे. आता छोटा शकीलच म्होरक्या झाल्याने त्याच्या वतीने फईम मचमच दूरध्वनी करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईत सध्या खंडणीसाठी येणारे दूरध्वनी कमी असले तरी आजही त्याची नोंद होत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागातील सूत्रांनी दिली. छोटा राजनमार्फत सध्या अबू सावंत आघाडी सांभाळत आहे. अरुण गवळी, अश्विन नाईक टोळी आता फारशी सक्रिय नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गुरु साटम, हेमंत पुजारी, कुमार पिल्ले यांची टोळीही सध्या थंडावली असली तरी अधूनमधून डोके वर काढीत असते. परंतु या टोळ्यांचा आता पूर्वीसारखा वचक राहिलेला नाही, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
गुन्हेगारी जगतात सध्या दाऊद, छोटा राजन टोळीपाठोपाठ रवी पुजारी टोळीचा धसका घेतला जातो. मात्र फक्त पुजारी टोळीच थेट खंडणीत सक्रिय असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दाऊद आणि छोटा राजन टोळीवर खंडणीसाठी दूरध्वनी करण्याची फारशी वेळ येत नाही. त्यांचे काही साथीदारच विकासक झाल्यामुळे त्यांच्याकडे थेट खंडणी पोहोचत असते, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
गुंड टोळ्या व त्यांचे सहायक..
’  दाऊद टोळी – छोटा शकील – फईम मचमच.
’ छोटा राजन – भरत नेपाळी-संतोष शेट्टी – अबू सावंत.
’  रवी पुजारी – अशोक देवाडिगा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा