गेल्या दोन दिवसांपासून उच्चांकी तापमानामुळे हैराण झालेल्या सोलापूरकरांना सोमवारी मात्र काहीसा दिलासा मिळाला. ४३.४ अंश सेल्सियसपर्यंत वाढलेल्या तापमानाचा पारा सोमवारी तब्बल आठ अंशांनी कमी होऊन ३५.४ अंश सेल्सियसपर्यंत खाली आला. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा खालावला तरी उकाडा कायम होता.
दहा दिवसांपूर्वी सोलापूरचे तापमान यंदाच्या उन्हाळ्यात उच्चांकी स्वरूपात  म्हणजे ४३.६ अंश सेल्सियसपर्यंत वाढले होते. मात्र नंतर ते सहा अंशापर्यंत म्हणजे ३७ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले होते. परंतु नंतर पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून तापमान वाढत चालले होते. गेल्या शनिवारी ४३ तर दुसऱ्या दिवशी, काल रविवारी त्यात पुन्हा वाढ होऊन ४३.४ सेल्सियसपर्यंत तापमानाचा पारा गेला होता. त्यामुळे अवघे सोलापूरकर हैराण झाले असताना सुदैवाने सोमवारी तापमान खालावत ३५.६ अंश सेल्सियसपर्यंत खाली उतरल्याचे दिसून आले. दिवसभर सूर्यनारायणाचे दर्शन क्वचितच झाले. सर्वत्र ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाची चिन्हे दिसत होती. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत पावसाने हजेरी लावली नाही. तथापि, दिवसभर उकाडा चांगलाच जाणवला.

Story img Loader