दुष्काळी परिस्थितीमुळे एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना दुसरीकडे उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालले असून बुधवारी तर तापमानाचा पारा उच्चांकी म्हणजे ४३.६ अंश सेल्सियसपर्यंत वाढल्याचे स्पष्ट झाले. वाढत्या उष्म्याचा त्रास सहन होत नसल्याने दुपारी जनजीवनावर चांगलाच परिणाम जाणवत आहे. दरम्यान, दुपारी तापमानाने उच्चांक केला असताना सायंकाळी मात्र अचानकपणे हवामानात बदल होऊन वादळी वारे सुरू झाले. नंतर पाऊसही बरसला.
तीन दिवसांपूर्वी सोलापूरचे तापमान ४३.३ अंश सेल्सियसपर्यंत मोजले गेले होते. यंदाच्या उन्हाळ्यात हे तापमान उच्चांकी समजले गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तापमानात किंचित म्हणजे एक अंशाने घट झाली. परंतु काल मंगळवारी पुन्हा तापमान ४३ अंशापर्यंत वाढले. त्यानंतर बुधवारी तर या तापमानाने उच्चांक केला. तब्बल ४३.६ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. त्यामुळे एप्रिलनंतर चालू मे महिना आणखी त्रासदायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सकाळी दहानंतर उन्हाची प्रखरता वाढत चालल्याचा अनुभव असल्याने नागरिक आपली कामे सकाळीच उरकून घेण्यावर भर देताना दिसून येतात. दुपारी सार्वजनिक वाहतूक जवळपास ठप्प होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यातच सायंकाळी मात्र अचानकपणे हवामानात बदल होऊन काही क्षणातच जोरदार वादळी वारे सुटले. आणि त्यापाठोपाठ बेमोसमी पावसालाही प्रारंभ झाला. या वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेल्या वादळी-वारे व पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची कटू आठवण जागी झाली. 

Story img Loader