दुष्काळाने होरपळणाऱ्या सोलापूर परिसरात यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच असून हा असह्य़ उन्हाळा कधी एकदाचा संपतो, याची प्रतीक्षा सारेच जण करू लागले आहेत. काल रविवारी सोलापूरचे तापमान ४३.३ अंश सेल्सियसपर्यंत उच्चांकी स्वरूपात मोजले गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी या तापमानात एक अंशाने घट झाली असली तरी उष्म्यामुळे आबालवृध्द अक्षरश: हैराण झाल्याचे दिसून येते.
सोमवारी सोलापूरचे तापमान ४२.३ अंश सेल्सियसपर्यंत नोंदविण्यात आले. सकाळी दहापासूनच उन्हाच्या झळा बसत असून त्यामुळे उन्हाचा त्रास टाळण्यासाठी शक्यतो आपली कामे शक्यतो सकाळीच किंवा ऊन उतरल्यानंतर सायंकाळी उरकण्यावर सर्वाचा भर दिसून येतो. उन्हामुळे उष्मा वाढत चालल्याने अंगाची लाही लाही होत आहे. घरात किंवा कार्यालयात उष्म्याचा बचाव करायचा तर विद्युत पंखे सुरू केले असता गरम वारा वाहत आहे. विद्युत पंखे काम करेनासे झाल्याने कूलरची मदत घेतली जात आहे. तर ऐपतदार मंडळी वातानुकूलन यंत्रणेचा वापर करताना दिसून येतात. सुदैवाने शहरात विद्युत भारनियमनाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
उन्हामुळे कासावीस झालेली मंडळी सायंकाळी उष्मा कमी होत असताना उद्यानांमध्ये गर्दी करीत आहेत. थंड पेयांना मागणी वाढली आहे. तसेच कलिंगड, टरबूज आदी फळांनाही मागणी वाढली आहे. उन्हाळ्यामुळे लहान मुलांना ताप व अन्य आजार होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.