सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखडय़ापासून ते अगदी अलीकडच्या काळात शासकीय पातळीवर झालेल्या बैठकींपर्यंत नाशिक शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या निश्चित झालेल्या विषयाला अखेरच्या टप्प्यात कात्रजचा घाट दाखविला गेल्याचे अधोरेखित झाले आहे. सिंहस्थादरम्यान आता पाच महिन्यांच्या कालावधीसाठी शहरात तात्पुरत्या स्वरूपात ३४८ सीसीटीव्ही कॅमेरे भाडेतत्त्वावर बसविण्यात येणार आहेत. अचानक बदललेल्या या निर्णयामुळे संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण होण्याचा विषय निकाली निघाला आहे. नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर २०५ कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थापुरतीच तात्पुरत्या स्वरूपात ही यंत्रणा उभारली जाणार होती.
सिंहस्थाला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने आणि त्यात या अनुषंगाने होणारी कामे वेगवेगळ्या कारणांस्तव प्रलंबित असल्याची ओरड साधुमहंतांकडून सुरू असल्याने प्रशासनाने सर्व कामे विहित मुदतीत करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. कुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबकनगरीत लाखो भाविक दाखल होणार आहेत. शाही पर्वणीच्या दिवशी ही संख्या कित्येक पटींनी वाढणार असल्याचा अंदाज आहे. या कालावधीत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा जय्यत तयारी करत असून त्यात सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक शहरातील महत्त्वपूर्ण चौक व रस्ते, गोदाकाठावरील संपूर्ण परिसर, साधुग्राम, बस व रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्याचे पोलिसांचे नियोजन आहे. सिंहस्थाच्या माध्यमातून नाशिक शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेची व्यवस्था उभी करण्याचा पोलिसांचा मनोदय होता. यामुळे जेव्हा प्रत्येक शासकीय विभागाने आपापले आराखडे सादर केले, तेव्हा शहर पोलिसांनी कायमस्वरूपी ही यंत्रणा उभारली जावी असा प्रस्ताव सादर केला होता. सिंहस्थाच्या २३०० कोटींच्या मंजूर आराखडय़ातदेखील नाशिकमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा अंतर्भाव आहे.
कायमस्वरूपी व्यवस्थेच्या माध्यमातून गुन्हेगारी कारवाया आणि संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे सुलभ जाणार असल्याचे गृहीतक होते. मागील काही वर्षांत शहरात गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेणे, बाहेरगावाहून आलेल्या भाविकांची लुबाडणूक, टोळक्यांचा धुमाकूळ आदी प्रकार नेहमी घडत असतात. यामुळे संपूर्ण शहरात सीसीटीव्हीचे जाळे उभारण्याचा विषय चर्चेत होता. गुन्हेगारी कारवायांना लगाम घालण्यासाठी पोलीस यंत्रणेला ही व्यवस्था साहाय्यभूत ठरणार होती. या कामी खर्च मोठा असल्याने चर्चेच्या परिघाबाहेर न पडलेला हा विषय सिंहस्थ निधीतून मार्गी लागेल, अशी सर्वाची अपेक्षा होती. महिनाभरापूर्वी नागपूर येथे झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत नाशिकमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कायमस्वरूपी बसविण्याबाबत सर्वाचे एकमत होते. खुद्द नाशिकच्या पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत त्याचे संकेत दिले होते. कुंभमेळा उंबरठय़ावर आला असताना त्यात शासन स्तरावरून अचानक बदल झाला आणि अखेर ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरात भाडेतत्त्वावर ३४८, तर त्र्यंबकेश्वर येथे २०५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पोलीस यंत्रणेने निविदा प्रसिद्ध केली आहे. १५ जून २०१५ ते ३० ऑक्टोबर २०१५ या सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीसाठी ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात उभारली जाईल. शाही स्नान, गोदा काठाकडे येणारे रस्ते व आसपासची ठिकाणे, शाही मार्ग आदी परिसराचे पोलीस यंत्रणेने आधीच सर्वेक्षण केले आहे. त्याआधारे सीसीटीव्हींची गरज कुठे आहे ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या स्वरूपाचे सर्वेक्षण ग्रामीण पोलीस दलाने त्र्यंबकेश्वर येथे केले आहे. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराच्या विकासाला हातभार लावणारी कायमस्वरूपी कामे होत असतात. यंदा नाशिक शहरात सीसीटीव्ही यंत्रणेचे कायमस्वरूपी जाळे उभे राहील ही आशा होती. परंतु, तीदेखील फोल ठरली आहे.

Story img Loader