साहित्य-सांस्कृतिक विश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे ‘ललित’ मासिक पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. त्या निमित्ताने पुढील वर्षभरात मासिकाचे १० विशेषांक प्रकाशित होणार असून मराठी भाषेचे विद्यार्थी, अभ्यासक आणि साहित्यप्रेमींसाठी तो संग्राह्य़ दस्तऐवज ठरणार आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०१३ हे ‘ललित’ मासिकाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असेल. या वर्षांत १० विशेषांक आणि दिवाळी अंक असे ११ अंक प्रसिद्ध होणार आहेत. मराठी साहित्य आणि वाचन संस्कृतीशी संबंधित असे विषय या विशेषांकासाठी निवडण्यात आले असून प्रत्येक अंकाचा एक विशेष अतिथी संपादक असणार आहे.
वाचनसंस्कृती, कविता, ललित गद्य, समीक्षा, वाङ्मयीन नियतकालिके, चरित्रे-आत्मचरित्रे, कथा, दृश्यकला, नाटक आणि कादंबरी अशा विषयांवर हे विशेष अंक निघणार आहेत. या सर्व अंकांचे अतिथी संपादक अनुक्रमे संजय भास्कर जोशी, वसंत पाटणखर, वि. शं. चौघुले, विलास खोले, सतीश काळसेकर, मीना वैशंपायन, पुष्पलता राजापुरे-तापस, वसंत सरवटे/दीपक घारे, अनंत देशमुख व नागनाथ कोतापल्ले असणार आहेत. तसेच गेल्या ५० वर्षांतील मराठी साहित्याचा परामर्ष घेणारे प्रत्येकी किमान पाचशे पृष्ठांचे दोन खंडही प्रकाशित केले जाणार आहेत. या दोन खंडात गेल्या पन्नास वर्षांतील कविता, कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णन, ललितगद्य, तुलनात्मक साहित्य, भाषांतरित साहित्य, विज्ञान साहित्य, कोशवाङ्मय, लोकप्रिय साहित्य, दलित साहित्य आदी विविध विषयांचा व साहित्याचा आढावा घेणारे लेखन यात असणार आहे. विलास खोले व मीना वैशंपायन हे दोघे या ग्रंथांचे संपादन करणार आहेत.
दरम्यान ‘ललित’ मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने ‘ललित सुवर्णमहोत्सव समिती’ स्थापन करण्यात आली आहे. ‘ललित’ मासिकाचे संपादक अशोक कोठावळे या समितीचे निमंत्रक असून ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक हे या समितीचे अध्यक्ष आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा