गोरेगाव (पूर्व) येथील नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा दहावे वर्ष असून त्यानिमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी गोरेगावातील सुमारे ५० संस्थांच्या प्रतिनिधींची एक स्वागत समिती तयार करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ७ ते ११ या वेळेत ही यात्रा निघणार आहे.
चित्ररथ, ध्वजपथके व लेझीम पथके, खडम्ग, मनोरे आदी नेहमीच्या प्रात्यक्षिकांबरोबरच स्त्रीभ्रूणहत्या, दुष्काळ, पर्यावरण आदी विषयांवरही देखावे, पथनाटय़े व अन्य कार्यक्रम यात्रेमध्ये सादर करण्यात येणार आहेत. पुणेरी ढोल पथक हे सुद्धा यात्रेचे प्रमुख आकर्षण असणार आहे. स्वामी विवेकानंदांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताने शिकागो येथील सर्वधर्म परिषदेतील स्वामीजींच्या जगप्रसिद्ध भाषणाचा जिवंत देखावाही चित्ररथावर उभारण्यात येणार आहे. या यात्रेमध्ये राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांमधील सांस्कृतिक वैभव दाखविणारे देखावेही सादर होणार आहेत.
या यात्रेसाठी मंदिरे, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, व्यापारी संघटना, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघटना, ग्राहकसंस्था, शिक्षणसंस्था आदींच्या प्रतिनिधींची एक दशकपूर्ती स्वागत समिती स्थापन करण्यात आली आहे. आपापल्या स्थानिक वैशिष्टय़ांसह या संस्थांचे कार्यकर्ते यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती समितीचे अध्यक्ष सुहास कबरे यांनी दिली. दूधसागर कॉलनी येथून ही यात्रा निघून मसुराश्रम येथे तिची सांगता होईल. सामूहिक संपूर्ण वंदेमातरम गायनाने यात्रेचा समारोप होणार आहे. २००४ साली सुरू झालेल्या या गोरेगावातील सांस्कृतिक सोहळ्याच्या दहाव्या वर्षांत नागरिकांनी मोठय़ा संख्येने व उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रेचे कार्यवाह दिनेश राजपूत व सहाय्यक कार्यवाह अंकिता सोवनी यांनी केले आहे.