पुणे आणि पिंपरी या दोन शहरांमध्ये मिळून एक हजार सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना सातत्याने चर्चेत असली, तरी या योजनेसाठी निविदा मागविण्याची जाहिरातही अद्याप प्रसिद्ध झाली नसल्याची तसेच या जाहिरातीच्या प्रसिद्धीलाही अद्याप शासनाने मंजुरी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील सीसी टीव्ही योजना सध्या नक्की कोणत्या प्रक्रियेत आहे, तिला मंजुरी मिळाली आहे का, असे प्रश्न भारतीय जनता पक्षाचे गटनेता अशोक येनपुरे यांनी सोमवारी महापालिकेच्या मुख्य सभेत उपस्थित केले होते. या विषयावरील चर्चेत अनेक सदस्यांनी योजनेला होत असलेल्या विलंबावर जोरदार टीका केली. किशोर शिंदे, प्रशांत बधे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, अशोक हरणावळ, बाबू वागसकर, मुक्ता टिळक, राजू पवार, श्रीनाथ भिमाले, सभागृहनेते सुभाष जगताप, विरोधी पक्षनेते वसंत मोरे यांची या वेळी भाषणे झाली.
पुणे शहरात सीसी टीव्हींची योजना राबविण्याची योजना अद्यापही निविदा प्रक्रियेतच अडकली आहेत, ही गंभीर बाब आहे. पुण्याच्या सुरक्षितेतबाबतची ही अनास्था असून राज्य शासन झोपले आहे का, असा प्रश्न या वेळी अनेक सदस्यांनी उपस्थित केला. या योजनेच्या घोषणा झाल्या, पण शहरात योजना कधी येईल हे कोणालाही माहीत नाही, असेही आक्षेप या वेळी घेण्यात आले.
राज्य शासनाने या योजनेसाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली असून दुसरी एक समिती शहर पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली आहे. या योजनेचा पुण्याचा प्रकल्प अहवाल शासनाला सादर झालेला आहे, असे निवेदन या वेळी उपायुक्त सुधाकर देशमुख यांनी केले. या निवेदनाला अनेक सदस्यांनी आक्षेप घेतला. योजना नक्की कधी होणार आणि शहरात कॅमेरे कधी बसणार असे प्रश्न या वेळी विचारण्यात आले. त्यावर निवदेन करताना देशमुख म्हणाले, की योजनेसाठी जी निविदा काढावी लागणार आहे त्यासाठी योजनापत्र करण्यात आले आहे. त्याला मंजुरी मिळताच लगेच निविदा प्रसिद्ध होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा