क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ३ जानेवारी या जयंतीदिनापासून ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या १२ जानेवारी जन्मोत्सवापर्यंत वाशीम जिल्हा परिषदेच्यावतीने यावर्षीही दहा दिवस सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. या दहा दिवसात जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, शाळा व ग्रामपंचायतींमध्ये विविध कार्यक्रमाव्दारे महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा चौधरी यांनी दिली.
क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून महिलांना शिक्षणाची व्दारे खुली केली, तसेच राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वराज्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीत स्वाभिमानाचा हुंकार पेरला या दोन्हीही राष्ट्रमातांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचावेत यासाठी गतवर्षी वाशीम जिल्हा परिषदेने राज्यात सर्वप्रथम शासकीय स्तरावर जिजाऊ-सावित्री दशरात्रोत्सव राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन जिल्ह्यात विविध कार्यक्रमाव्दारे साजरा केला. गतवर्षी या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेने येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मदानावर घेतलेला महिला बचत गटांचा मेळावा व विक्री प्रदर्शनी जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी नवसंजीवनी ठरली होती. ही बाब लक्षात घेऊन आता जिल्हा परिषद प्रशासनाने यावर्षीही ३ जानेवारी ते १२ जानेवारीपर्यंत दशरात्रोत्सव विविध कार्यक्रमांव्दारे साजरा करण्याचे ठरविले आहे.
गुरुवार ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमधून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून स्त्रीभ्रूणहत्या, लेक वाचवा, स्त्री साक्षरता, शौचालय जागर, झाडे लावा झाडे जगवा, ग्रामस्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे रात्री प्रबोधन स्पर्धा, व्याख्यानमाला, सामान्य ज्ञान स्पर्धा, एकांकिका इत्यादी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
४ जानेवारी रोजी ग्रामस्वच्छता अभियानाबाबत महिलांची भूमिका, याबाबत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करण्यात येणार आह.े
५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिलांची आरोग्य तपासणी होणार आहे. ६ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियानाबाबत जनसंवाद कार्यक्रम प्रत्येक गावात घेतला जाणार आहे. ७ जानेवारी रोजी सावित्री, जिजाऊ, अहल्याबाई होळकर, रमाई, भीमाई, फातीमाबी शेख, मुक्ता साळवे, ताराराणी िशदे आदी महानायिकांचे कर्तृत्व महिलांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने जागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ८ जानेवारी रोजी प्रत्येक शासकीय विभागातील योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावपातळीवर तलाठी व ग्रामसेवकांच्या माध्यमातून योजना वाचन व मार्गदर्शन कार्यक्रम राबवला जाणार आहे.
९ जानेवारी रोजी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रत्येक गावात चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी शक्य असेल तेथे शिबीर व मेळावे घेतले जाणार आहेत. १० जानेवारी रोजी स्त्री साक्षरता व त्याबाबत शासनांच्या योजनांबाबत माहिती प्रत्येक गावात दिली जाणार आहे.
११ जानेवारी रोजी स्वच्छ शाळांबाबत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत कार्यक्रम घेतला जाणार आहे आणि १२ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजतापासून समारोपीय कार्यक्रम प्रत्येक शाळा व ग्रामपंचायतस्तरावर घेतला जाणार आहे.  त्यासोबतच जिल्हास्तरावर जिजाऊ-सावित्री दशरात्रौत्सव कार्यक्रम घेतला जाणार आहे.  या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी, विविध सहकारी संस्थाचे संचालक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक, कवी, सर्व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत समारोपीय कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा चौधरी यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा