जनमानसात दहशतवाद्यांची प्रतिमा ही क्रूर आणि भयानक असली तरी प्रत्यक्षात मात्र ते भ्याड असल्याचे मत उच्च न्यायालयाचे नुकतेच निवृत्त झालेले आणि १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोटाचा ऐतिहासिक खटला चालविणारे न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

‘मुंबई प्रेस क्लब’च्या वतीने न्यायमूर्ती कोदे यांचे ‘दहशतवाद, खटला आणि प्रसिद्धीमाध्यमे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळेस बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. १९९३चा बॉम्बस्फोट खटला हा देशातील सर्वाधिक प्रदीर्घ काळ चालेला खटला असून त्यामध्ये अभिनेता संजय दत्त, हल्ल्याचा सूत्रधार टायगर मेमन याच्या कुटुंबियांसह एकूण १०० आरोपींना न्यायमूर्ती कोदे यांनी दोषी धरून शिक्षा सुनावली होती. त्यातही याकूब मेमनसह १२ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. दहशतवादी हे क्रूर असतात असेच मानले जाते. प्रत्यक्षात ते भ्याड असतात आणि दहशतवादी कृत्य करण्यामागे गुन्हेगार म्हणून असलेली ओळख लपविण्याची धडपड असते, असेही न्यायमूर्ती कोदे यांनी दहशतवाद्यांबाबत आपले मत व्यक्त करताना स्पष्ट केले. १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्याचा अनुभव सांगताना पहिल्यांदाच आरडीएक्सचा वापर करण्यात आल्याने हा खटला खूप गंभीर होता. सुदैवाने त्यानंतर आरडीएक्सचा वापर करण्यात आला नाही, असे त्यांनी म्हटले. फाशीची शिक्षा देण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, जगभर हा चर्चेचा मुद्दा आहे. परंतु जर फाशीच्या शिक्षेची कायद्यात तरतूद असेल तर ज्या खटल्यांमध्ये फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते तेथे ती दिली जाण्यात गैर नाही.