राज्यातील सर्वाधिक ४८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद आज चंद्रपूर शहरात घेण्यात आली असून विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेने उसळी घेतल्याने लोक भयभीत झाले आहेत. कडक उन्हामुळे नागपूर आणि चंद्रपूर शहरातील मुख्य रस्ते ओस पडले असून शासकीय व निमशासकीय कार्यालयातही कडक उन्हामुळे कर्मचारी वगळता अक्षरश: शुकशुकाट दिसून येत आहे.
मे महिन्याच्या सुरूवाती पासूनच विदर्भात कडक उन्हाळा तापायला सुरूवात झाली. मे महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात जिथे ४७.६ अंश तापमानाची नोंद घेण्यात आली तेथे शेवटच्या आठवडय़ाला सुरूवात होताच उन्हाचा पारा तीव्र होण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या दोन दिवसाचा विचार केला तर आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक ४८ अंश तापमानाची नोंद आज सोमवारी करण्यात आली आहे. रविवारी उन्हाचा पारा ४७.९ अंशावर पोहचला होता. कडक उन्हामुळे उष्णतेच्या अक्षरश: झळा वाहत असून लोकांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. सकाळी नऊ वाजतापासूनच कडक उन्ह पडायला सुरूवात होते. दहा वाजता सूर्य अक्षरश: डोक्यावर आलेला असतो. दहा वाजताची वेळ शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयात जाण्याची वेळ आहे. मात्र या वेळी शहरातील सर्व प्रमुख रस्ते ओस पडलेले असतात. सकाळी दहाच्या सुमारासदेखील चंद्रपूर शहरातील एकही नागरिक रस्त्यावर दिसत नसल्याने संचारबंदी सारखी अवस्था झालेली असते.
पाळीव प्राणी, कुत्रे, गायी, म्हशी सुध्दा उन्हामुळे रस्त्यावर दिसत नाहीत इतका धसका या उन्हाचा आहे. रेकॉर्डब्रेक तापमानामुळे चंद्रपूरचे जिल्हय़ाचे नाव जागतिक नकाशावर आले असले तरी उन्हामुळे शहरातील लोक त्रास्त झाले आहेत. ४८ अंश सेल्सियसमध्ये कुलर, एसीने काम करणे बंद केले आहे. उष्णतेच्या लहरींमुळे लोक रस्त्याने मोटरसायकल किंवा कारमध्ये जातांना सुध्दा दुपट्टा बांधून जातात. गेल्या वर्षी या शहरात उन्हाचा पारा ४६ अंशापर्यंत गेला होता. मात्र यंदा उष्णतेच्या लहरीनी आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले असून ४८ अंशामुळे लोक घाबरले आहेत. उष्णतेचा सर्वाधिक परिणाम हा बाजारपेठेवर झालेला असून लग्नसराईचे दिवस असतांना सुध्दा कपडा बाजार, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, यासोबतच ऑटोमोबाईल्स, फर्निचर, मोबाईल शॉपी व इतर दुकाने ग्राहकांशिवाय ओस पडलेली आहेत. नागपूर व इतर शहरात दुपारी उष्णतेचा पारा ४७ अंश राहात असला तरी हिरवळीमुळे ही सर्व शहरे रात्री थंड ंझालेली असतात. मात्र या शहरात दिवसा ४८ अंश सेल्सियस तापमान असते तेथे रात्रीसुद्धा तब्बल ३९ तापमान राहत आहे. वेकोलिच्या कोळसा खाणी, वीज केंद्र तसेच नव्याने येऊ घातलेले वीज प्रकल्प यामुळे या शहरातील उष्णतेत सातत्याने वाढ होत चाललेली आहे. जंगलाने समृध्द असलेल्या या जिल्हय़ात कडक उष्णतेमुळे एक पक्षी सुध्दा आकाशात उडताना दिसत नाही इतकी वाईट अवस्था येथे झालेली आहे.
हा उन्हाळा आणखी १५ जून पर्यंत असाच कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. शहरात आलेली उष्णतेची लाट बघता शहरातील अनेक परिवार थंड हवेच्या ठिकाणी काश्मीर, कोडाईकनाल, महाबळेश्वर, गॅंगटक येथे फिरायला गेले असल्याची माहिती एका टूर अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकाने दिली.
उन्हाचा दहशतवाद; चंद्रपूर ४८ अंशांवर
राज्यातील सर्वाधिक ४८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद आज चंद्रपूर शहरात घेण्यात आली असून विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेने उसळी घेतल्याने लोक भयभीत झाले आहेत. कडक उन्हामुळे नागपूर आणि चंद्रपूर शहरातील मुख्य रस्ते ओस पडले असून शासकीय व निमशासकीय कार्यालयातही कडक उन्हामुळे कर्मचारी वगळता अक्षरश: शुकशुकाट दिसून येत आहे.
First published on: 21-05-2013 at 01:24 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorism of sunshine chandrapur on 48 digree