विनयभंगाच्या घटना उघडपणे होत नाहीत. परिणामी अशा घटनांना साक्षीदारही नसतात. त्यामुळेच विनयभंग प्रकरणातील महिलेची साक्ष हीच आरोपीला शिक्षा ठोठावण्यासाठी पुरेशी असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने विनयभंगप्रकरणी आरोपीला झालेल्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करताना दिला.
तानाजी शिंदे याला सोलापूर महानगरदंडाधिकारी आणि सोलापूर सत्र न्यायालयाने विनयभंगाच्या आरोपात दोषी धरत शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला शिंदे याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती रोशन दळवी यांच्यासमोर त्याच्या अपिलावर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने हा निर्वाळा दिला.
शिंदे हा २६ ऑक्टोबर २००४ रोजी दुपारी पीडित महिलेच्या घरात घुसला आणि त्याने तिच्याशी असभ्य वर्तन केले. तिने मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, त्या वेळेस त्याने तिचे तोंड बंद केले. शिंदे घरातून निघून गेल्यानंतर संबंधित महिला पोलिसांत तक्रार करण्यासाठी बाहेर पडली. परंतु शिंदे आणि त्याच्या तीन मित्रांनी तिला घराबाहेरच अडवले आणि धमकावले. सायंकाळी पती घरी परतल्यानंतरच घडल्याप्रकाराबाबत ती पोलिसांत तक्रार दाखल करू शकली. आरोपीच्या वतीने सुनावणीच्या वेळी युक्तिवाद करण्यात आला की, पीडित महिलेचे घर हे गर्दीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे आपल्या अशिलांविरुद्ध तिने केलेला आरोप हा खोटा आहे. परंतु न्यायालयाने शिंदेचा हा युक्तिवाद फेटाळून लावताना तक्रारदार महिलेच्या घराशेजारी बरीच घरे आहेत. भारतातील प्रत्येक गाव आणि शहरात किंबहुना हेच दृश्य असते. परंतु याचा अर्थ हा होत नाही की गर्दीच्या ठिकाणी विनयभंगाचा वा अन्य गुन्हा घडत नाही. उलट अशा प्रकारचे गुन्हे उघडपणे केलेच जात नाहीत. त्यामुळे असा गुन्हा घडला हे सांगणारा साक्षीदारही नसतो, असे नमूद केले.
या प्रकरणातही गुन्हा घडला तेव्हा तक्रारदार महिला घरी एकटीच होती. त्यामुळे आरोपींनी घरात घुसून तिचा विनयभंग केला अथवा तिच्याशी असभ्य वर्तन केले याची ती एकमेव साक्षीदार आहे. त्यामुळेच तिने दिलेली साक्ष ही नैसर्गिक आणि स्वीकारण्याजोगी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट करीत शिंदेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा