शिक्षक अध्यापन पदविकाधारक परीक्षेत विद्यार्थ्यांच्या बौध्दिक पातळीवरचे चुकीचे प्रश्न विचारल्यामुळे निकालावर विपरीत परिणाम झाला असून, गैरकायदेशीर प्रश्नपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. याबाबत पुणे परीक्षा परिषद आयुक्तांची चौकशी करून त्यांच्याविरुध्द कारवाई करावी, या मागणीसाठी बुधवारी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टीईटी जनआंदोलन समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
 यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिक्षण राज्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार अध्यापन पदविकाधारक विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षक पदाकरिता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्या दृष्टीकोनातून ही परीक्षा घेण्याची जबाबदारी आयुक्त, परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडे सोपविण्यात आलेली होती, परंतु ही परीक्षा घेतांना त्यांनी प्रश्नपत्रिका तयार करतांना अत्यंत चुकीच्या पातळीवरील प्रश्न काढून विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे. त्यात सर्वसाधारणपणे नियमीतता झालेली आहे.
 उपरोक्त शासन निर्णय क्र. २ नुसार प्राथमिक स्तर (पेपर एक) इयत्ता १ ली ते ५ वी साठी देण्यात आलेल्या आराखडय़ातील चारही विभागातील प्रश्न  इयत्ता १ ली ते ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठीण्य पातळी (एसएससी लेव्हल)चे राहतील, असे निर्देश आहेत.
उच्च प्राथमिक स्तर (पेपर दोन) इयत्ता ६ वी ते ८ वी साठी देण्यात आलेल्या चारही विभागातील सर्व विषयाचे प्रश्न हे इयत्ता ६ वी ते ८ वीचे अभ्यासक्रमातील घटकांवर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठीण्य पातळीचे प्रश्न असतील, असे निर्देश असतांना आयुक्तांनी पेपर एकमध्ये उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, पदवी परीक्षा व राज्य सेवा परीक्षा या काठीण्य पातळीचे (हायर सेकंडरी लेव्हल) प्रश्न विचारले, तसेच पेपर २ मध्ये पदवी पातळी व राज्य सेवा परीक्षा पातळीच्या काठीण्य पातळीचे प्रश्न विचारले. शिक्षक अध्यापन पदविकाधारक विद्यार्थ्यांच्या बौध्दिक पातळीच्या वरचे प्रश्न विचारल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व निकालावर त्यांचा विपरीत परिणाम झाला असून त्यांच्यावर या गैरकायदेशीर प्रश्नपत्रिकेमुळे अन्याय झालेला आहे. तरी या संदर्भात आयुक्तांची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध तात्काळ निलंबनाची कारवाई करून ही परीक्षा पुन्हा घेण्याबाबत शासनाला निर्देश देण्यात यावेत, असे निवेदनात नमूद आहे.
या आंदोलनात सचिन खेडेकर, अमोल म्हस्के, विजू ठोकरे, राजेश वैद्य, बाळू काळे, समाधान जाधव, प्रताप वागोरे, प्रमोद वायाळ, वसंता जाधव, नितीन कप्पीले, गौतम गवई, ज्ञानेश्वर शेळके, प्रविण वानखेडे, संध्या खेडेकर, गणेश वसाने, समाधान जाधव, मनोज ठाकरे, कैलास जाधव आदिंनी सहभाग घेतला होता.

Story img Loader