शिवाजी विद्यापीठात रंगलेल्या कबड्डी सामन्यांच्या पहिल्याच दिवशी थायलंडच्या मुले-मुली खेळाडूंनी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील मुले-मुली संघाचा पराभव करून बुधवारी विजयी सलामी दिली.    
थायलंड येथील इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या वतीने अभ्यास दौरा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. राजर्षी शाहू महाविद्यालय व थायलंडचे कबड्डी खेळाडू यांच्यामध्ये क्रीडा विषयक देवाण-घेवाण करार झालेला आहे. त्यानुसार थायलंडची कबड्डी खेळणारी आठ मुले व नऊ मुली प्रशिक्षकासह कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आलेली आहेत. त्यांच्यातील पहिला सामना शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर सभागृहातील मॅटवर पार पडला. त्याचे उद््घाटन कुलगुरू डॉ.एन.जे.पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय महाडिक होते. हे प्रदर्शनीय सामने ३० मे अखेर चालणार आहेत.     थायलंडची मुले व शाहू महाविद्यालयाची मुले यांच्या पहिला सामना चांगलाच रंगला. हा सामना थायलंडच्या खेळाडूंनी ६८ विरुद्ध ५६ अशा गुणांनी जिंकला. पाठोपाठ थायलंडच्या मुलींनीही शाहू महाविद्यालयाच्या मुलींवर मात केली. सुरुवातीला हा सामना चांगला रंगला होता. नंतर मात्र तो अक्षरश एकतर्फी झाला. या लढतीत थायलंडच्या मुलींनी ७८ विरुद्ध ३८ अशा चाळीस गुणांनी बाजी मारली.
 राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा.संभाजी पाटील, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी, महाराष्ट्र राज्य पंच संघटनेचे सदस्य अजित पाटील, भगवान पोवार, दत्तात्रय खराडे, जवाहर पाटील, प्रा.वीरसेन पाटील, उदय चव्हाण, प्रा.शेखर शहा यांनी या स्पर्धेचे संयोजन केले आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा