* घोडबंदर येथे नव्या जागेचा पर्याय  
* नव्याने निविदा मागविणार
* तांत्रिक तपासणी आवश्यक
तरंगत्या अशा भल्यामोठय़ा ‘हेलियम बलून’मध्ये बसून ठाणे नगरीचे विहंगावलोकन करण्याचे ठाणेकरांचे स्वप्न पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गुजरातमधील अहमदाबाद येथील कनकरिया तलावाच्या धर्तीवर ठाण्यातील मुल्लाबाग येथील निसर्ग उद्यानात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने वर्षभरापूर्वी घेतला. ठाणे महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेतील बडय़ा नेत्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून हा प्रकल्प ओळखला जातो. शहरातील मधोमध अशा मुल्लाबाग येथील निसर्ग उद्यानाची जागा विहंगावलोकनासाठी निश्चितही करण्यात आली होती. मात्र तब्बल वर्षभर घासाघीस केल्यानंतर मुल्लाबाग येथे हा प्रकल्प उभारणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य नाही, या मताशी महापालिकेचा प्रकल्प विभाग आला असून, घोडबंदर येथील नव्या जागेत हवेत तरंगणारा हा आगळावेगळा ‘बलून’ उभारता येईल का, याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
ठाणे शहरात दर्जेदार अशा पर्यटनस्थळाची उभारणी केली जावी, असा आग्रह शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी धरल्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर स्थानिक शिवसेना नेत्यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांची आखणी सुरू केली. घोडबंदर मार्गालगत सुमारे २१८ हेक्टर जागेवर राज्यातील पहिले श्ॉलो वॉटर पार्क उभारण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली, तर पूर्व द्रुतगती महामार्गावर जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारणीचा निर्णयही घेण्यात आला. शॉलो पार्कच्या माध्यमातून ठाण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन तसेच मनोरंजन केंद्र उभारता येईल का, याची चाचपणी गेल्या काही वर्षांपासून महापालिका वर्तुळात सुरू आहे.
पर्यटनासाठी हे महत्त्वाचे प्रकल्प हाती घेत असताना शहराच्या मध्यभागी हेलियम बलून प्रकल्पाची कल्पनाही शिवसेना नेत्यांनी पुढे आणली. गुजरात येथील कनकरिया तलावाभोवती उभारण्यात आलेला हा प्रकल्प पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र बनला आहे. हवेत तरंगणाऱ्या या भल्यामोठय़ा फुग्यात बसून संपूर्ण शहराचे विहंगावलोकन करता येईल, अशी या प्रकल्पाची मूळ कल्पना आहे. मुल्लाबाग येथील निसर्ग उद्यानात हा प्रकल्प उभारण्यात यावा, असे वर्षभरापूर्वी पक्केठरले. खासगी तत्त्वावर या प्रकल्पाची उभारणी केली जावी, जेणेकरून महापालिकेवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही, असेही ठरले. यासंबंधी वर्षभरापूर्वी निविदा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली, मात्र त्यास योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने नव्याने निविदा मागविल्या.
ही प्रक्रिया सुरू असताना पात्र ठरलेल्या एका निविदाकाराने निसर्ग उद्यानात हा प्रकल्प उभारण्यात येणाऱ्या अडचणींचा पाढाच उद्यान विभागास वाचून दाखविला. मुल्लाबाग येथील निसर्ग उद्यानात प्रवेश करण्यासाठी असलेला रस्ता अत्यंत अरुंद असून उद्यानावरून मधोमध उच्चदाबाची वीजवाहिनी जाते. तसेच या भागात वन विभागाच्या अखत्यारीत येणारी असंख्य झाडे असून, त्यामुळे याठिकाणी हा प्रकल्प उभारण्यास तांत्रिक अडचणी उभ्या राहण्याची भीती आहे. त्यामुळे हेलियम बलून मुल्लाबाग येथे उभारायचा नाही, असा निर्णय आता महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. यासाठी नव्या जागेचा शोध सुरू करण्यात आला असून, घोडबंदर मार्गालगत असलेला सुमारे ४५ हजार चौरस मीटरचा भलामोठा भूखंड यासाठी निश्चित करण्यात आला आहे. हा भूखंड शहराच्या मध्यभागी नसला तरी विहंगावलोकनास आवश्यक उंची गाठण्यासाठी तो पुरेसा आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.   

Story img Loader