स्थानिक संस्था कराविरोधात लागलीच बंद पुकारून ठाणेकरांना वेठीस धरण्याऐवजी संयमाची भूमिका घेणाऱ्या ठाण्यातील व्यापाऱ्यांनी या प्रश्नावर मंगळवारी राज्याचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या भेटीत समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर आम्हीसुद्धा संपात सहभागी होऊ शकतो, अशी माहिती ठाणे व्यापारी महासंघाचे पदाधिकारी मुकेश सावला यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. व्यापाऱ्यांना बंदचे हत्यार उगारावे लागले तरीही शहरातील भाजी मंडई तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या बाजारपेठा सुरू राहतील, असेही सावला यांनी स्पष्ट केले.
स्थानिक संस्था कराविरोधात एल्गार पुकारत फेडरेशन ऑफ मर्चन्टस् असोसिएशन या व्यापाऱ्यांच्या महासंघाने बंदचे हत्यार उगारले आहे. असे असले तरी यासंबंधी ठाण्यातील व्यापाऱ्यांनी मात्र संयमाची भूमिका घेतली   आहे.  मध्यंतरी गावदेवी मैदानापासून महापालिकेपर्यंत मोर्चा काढून या कराला विरोध करण्याची भूमिका ठाण्यातील व्यापाऱ्यांनी घेतली. मात्र, ठाणेकरांना वेठीस धरणारे कोणतेही पाऊल अद्याप ठाणे, कळवा, मुंब्रा भागातील व्यापाऱ्यांनी उचललेले नाही. आपला एलबीटीला विरोध नसून यातील जाचक अटींना संघटनेची हरकत आहे, अशी भूमिका ठाण्यातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे.  
दरम्यान, मुंबईतील व्यापाऱ्यांच्या बंदमध्ये किरकोळ विक्रेते सहभागी होण्याची शक्यता एकीकडे व्यक्त होत असली तरी ठाण्यातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी होणाऱ्या बैठकीनंतरच यासंबंधी निर्णय घेण्याचे ठरविले आहे.
मंगळवारी सायंकाळी ठाणे व्यापार उद्योग महासंघाचे पदाधिकारी हे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांना भेटणार आहेत. या बैठकीत ठोस आश्वासन मिळाले नाही तर येत्या ८ मेपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा व्यापारी महासंघाने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा