राज्याची सांस्कृतिक उपराजधानी असा लौकिक असणाऱ्या ठाणे परिसरात पारंपरिक सण आणि उत्सव अतिशय उत्साहाने साजरे करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. दहीहंडीही त्यास अपवाद नाही. स्थानिक मित्रमंडळांच्या माध्यमातून हे उत्सव आयोजित केले जात होते. मात्र ८० आणि ९०च्या दशकात राजकीय मंडळींनी पद आणि पैशाच्या बळावर या उत्सवावर ताबा मिळवून त्याचे स्वरूपच बदलून टाकले. हंडय़ांची उंची बक्षिसांच्या पटीत वाढली. ती फोडण्यासाठी आठ ते नऊ थर लावण्याची ईर्षां गोविंदा मंडळांमध्ये निर्माण झाली. सार्वजनिक उत्सवांमधून प्रबोधन आणि मनोरंजनाचा हेतू मागे पडला. उलट आता असे उत्सव सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. अघोषित संचारबंदी असल्यासारखे त्यांना एकतर घरात अडकून पडावे लागते अथवा सकाळीच घर सोडून दूर कुठेतरी जावे लागते. उत्सव म्हणजे ध्वनिप्रदूषण, रस्ते अडवून टाकलेले मंडप किंवा वाहतूक कोंडी अशी विद्यमान परिस्थिती असणाऱ्या ठाणेकरांना पूर्वीची दहीहंडी आठवते.
उत्सव मैदानात हवा
सत्तरच्या दशकापर्यंत ठाणे आपले गावपण टिकवून होते. वाडय़ा, वस्त्या आणि आळ्या होत्या. त्या त्या परिसरातील तरुण सार्वजनिक उत्सवात सहभागी होत. कृष्ण आणि गोपिकांच्या वेशात लहान मुलांच्या शोभायात्रा काढल्या जात होत्या. त्यानंतर दहीहंडी फोडली जायची. दुपारी दोन-अडीचपर्यंत हंडय़ा फुटायच्या. त्यानंतर घरोघरी दही-पोह्य़ाचा प्रसाद वाटला जायचा. काही हौशी त्यानंतर मोठय़ा हंडय़ा पाहायला दादरला जायचे. माझ्या लहानपणी तत्त्वज्ञान विद्यापीठात साजरी होणारी दहीहंडी मला अजूनही आठवते. पाडुरंगशास्त्री आठवले स्वत: त्या उत्सवात भाग घेत होते. अर्थात काळानुसार उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीत बदल होतो, हे मान्य असले तरी त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये असे वाटते. दादोजी कोंडदेव स्टेडिअम अथवा पोलीस मैदानात मोठय़ा हंडय़ा आयोजित करणे योग्य ठरेल.
– विनय नाईक (व्यावसायिक)
परंपरेची हंडी कधीच फुटली
पूर्वी भाबडेपणाने उत्सव साजरे होत. त्यात हिशेबीपणा नव्हता. ठाण्यात नुकतेच गृहनिर्माण सोसायटय़ांचे युग सुरू झाले होते. या नव्या इमारतीही जुन्या चाळींइतक्यात दोन अथवा मजली होत्या. त्यांच्यामध्ये पुरेशी जागा असल्याने हंडय़ा रस्त्यांवर बांधायची गरज नव्हती. पारंपरिक हंडी कधीच २० फुटांपेक्षा उंच नव्हती. स्थानिक गोविंदा पथकेच हंडय़ा फोडायचे. बक्षिसांचे आमिष नव्हते. उलट हंडी फोडल्यानंतर मडक्याची खापरं गोळा करण्यासाठी मुले चिखल चिवडायची. ते खापर मग धान्याच्या डब्यात ठेवले जाई. राजकीय प्रवृत्तींचा शिरकाव झाल्यानंतर अनिष्ट प्रथांच्या हंडय़ा बांधल्या जाऊ लागल्या.
– अमूल पंडित (लेखक व निवेदक)
गोविंदांची आयात होत नव्हती..
ठाणे पंचक्रोशीतील गावागावांमध्ये पारंपरिकपणे श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा होत आला आहे. प्रत्येक गावातील हंडय़ा स्थानिक गोविंदा पथकेच फोडत. आतासारखे मुंबईतून ट्रकमधून गोविंदा पथके येत नव्हती. हंडी फोडण्यापूर्वी परिसरात घरोघरी फिरून पाणी मागितले जाई. घरातील गृहिणी पाण्याबरोबरच गोविंदांना काहीतरी खाऊ देत. त्यात बऱ्याचदा शेवबुंदी असायची. हंडय़ा बांधण्यातही साधेपणा होता. गोविंदा पडून जखमी होतील इतक्या हंडय़ा कधीच उंच नव्हत्या. – सदाशिव टेटविलकर (इतिहासतज्ज्ञ)