राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ठाण्याच्या दौऱ्यावर आणत कळवा, मुंब्रा रेल्वे स्थानक परिसराच्या विकासाचे श्रेय पद्धतशीपणे आपल्या पदरात पाडून घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानक परिसराच्या विकासाकडे आपला मोर्चा वळविला आहे. ठाणे शहरात शिवसेनेचे तीन आमदार असूनही येथील रेल्वे स्थानक परिसरात समस्यांचे ढीग दिसून येतात. कळवा, मुंब््रयाचा विकास होऊ शकतो, मग ठाण्याचे भाग्य कधी उजळणार असा सवाल सर्वसामान्य प्रवाशी व्यक्त करताना दिसत आहेत. या पाश्र्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानक परिसराच्या विकासासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा खासदार निधी देण्याची घोषणा ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत केली. कळवा, मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांनी महापालिकेचा निधी वापरला होता. या पाश्र्वभूमीवर नाईक यांनी ठाण्यासाठी निधी देण्याची घोषणा करत निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला गुगली टाकल्याची चर्चा आता रंगली आहे.
वर्षांनुवर्षे खितपत पडलेल्या कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानक परिसराचा चेहरामोहरा बदलला असून ठाणे महापालिकेने या सर्व परिसराचा कायापालट घडवून आणल्याचे चित्र अगदी स्पष्टपणे दिसू लागले आहे. या सगळ्या कामासाठी या भागातील आमदार जीतेंद्र आव्हाड आणि खासदार आनंद परांजपे यांचा सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी वापरात आणण्यात आला आहे. महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक या सर्व परिसराचा विकास घडवून आणला असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या कामांच्या लोकार्पण सोहळ्यास हजेरी लावून मुंब््रयाचा विकासाचे श्रेय पद्धतशीपणे राष्ट्रवादीच्या पदरात पाडून घेण्याची खेळी केली. कळवा, मुंब्रा या दोन्ही स्थानक परिसरांचा कायापालट होत असताना ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मात्र समस्यांचा सुकाळ आहे. ठाणे शहरात शिवसेनेचे तीन आमदार असताना ठाणे रेल्वे स्थानक परिसराचा कायापालट होताना का दिसत नाही, असा सवाल सर्वसामान्य ठाणेकरांना पडला आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार एकनाथ िशदे यांनी मध्यंतरी आयुक्त राजीव यांच्यासमवेत एक दौरा आयोजित केला होता. यानंतर पूर्वेकडील भागात सॅटीससारखा प्रयोग राबविण्याविषयी महापालिका वर्तुळात विचार सुरू आहे. एकीकडे असे मोठे प्रकल्प राबविण्याविषयी विचार सुरू असला तरी फेरीवाले, रिक्षा थांबा, सॅटीसवरील वाहतुकीचे नियोजन असे साधे वाटणारे प्रश्नही सुटत नसल्याने ठाणेकर प्रवाशांमध्ये कमालीची नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात कळवा, मुंब्रा रेल्वे स्थानक परिसराचा झालेला विकास हा प्रचाराचा केंद्रिबदू करण्याची तयारी राष्ट्रवादीकडून सुरू झाली असून नेमक्या याच प्रश्नावर शिवसेनेच्या ठाण्यातील आमदारांना अडचणीत आणण्याची खेळी आता राष्ट्रवादीने सुरू केली आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसराचा विकास करण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा खासदार निधी देण्याची तयारी संजीव नाईक यांनी दाखवली असून राष्ट्रवादीच्या शहर शाखेने या परिसराच्या विकासाचे वेगवेगळे पर्याय पत्रकारांपुढे सादर केले. गेल्या चार वर्षांत ठाणे रेल्वे स्थानक परिसराच्या विकासासाठी राष्ट्रवादीने फारसा पुढाकार का घेतला नाही, अशी चर्चा आता रंगली असून निवडणुकांच्या तोंडावर या मुद्दय़ावर शिवसेनेला गुगली टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा