मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सदस्यपदाच्या निवडणुकीतील मतफुटीमुळे खडबडून जागे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आता ठाणे, भिवंडीतील पक्षाच्या नगरसेवकांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी ठाण्यातील नगरसेवकांची झाडाझडती घेताच कळवा परिसरातून पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने आपले मत फुटल्याची कबुली पवारांपुढे दिल्याचे वृत्त आहे. ठाणे महापालिकेत महापौरपद भूषविलेल्या या नगरसेवकाने राष्ट्रवादीतील इतर फुटीर नगरसेवकांची नावेही पवार यांच्यापुढे उघड केल्याने या फुटीचा खरा शिल्पकार कोण, या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे.
एमएमआरडीए सदस्यपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या मतफुटीमुळे उल्हानगरमधील पक्षाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला तर ठाण्यातील पक्षाचा एकमेव उमेदवारही कसाबसा निवडून आला. ठाण्यातील पक्षाच्या शहराध्यक्षपदाची धुरा जितेंद्र आव्हाडांकडे असली तरी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांना मानणारा एक मोठा गट ठाण्यात आजही कार्यरत आहे. या गटातटाच्या राजकारणाचा फटका ठाण्यातील राष्ट्रवादीला यापूर्वीही अनेकदा बसला आहे. एमएमआरडीए सदस्यपदाच्या निवडणुकीत ठाण्यातून जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक सुहास देसाई यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्यासाठी ठाण्यातून ३५ तर नवी मुंबईतून ४ नगरसेवकांचा कोटा ठरवून देण्यात आला होता. देसाई यांना प्रत्यक्षात ३१ मते मिळाली. ३९ मतांपैकी एका नगरसेवकाचे मत बाद झाले तर सात मते फुटल्याने राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. भिवंडी महापालिकेतील राष्ट्रवादीची नऊ मते फुटल्याची तक्रार उल्हानगरमधील पक्षाच्या पडेल उमेदवाराने पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. या मतफुटीमुळे खडबडून जागे झालेल्या पक्षश्रेष्ठींनी ठाण्यातील नगरसेवकांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली असून उपमुख्यमंत्री अजित पवारांपुढे पक्षातील काही ज्येष्ठ नगरसेवकांनी फुटीची कबुली दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

Story img Loader