दिवा ते ठाणेदरम्यान पाचवा व सहावा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. हा रेल्वे मार्ग कल्याण ते कुर्लापर्यंत पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गाने जोडला जाणार आहे. या रेल्वे मार्गावरून लोकल व लांब पल्ल्याच्या गाडय़ा स्वतंत्र मार्गावरून धावणार असल्याने लोकल वाहतुकीत यापुढे लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा अडथळा येणार नाही, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास कॉपरेरेशनचे व्यवस्थापकीय संचालक राकेश सक्सेना यांनी पत्रकारांना दिली दिली.
डोंबिवली पॅसेंजर्स असोसिएशनतर्फे माजी खा. रामभाऊ म्हाळगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रवासी दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, संयोजक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर महाजन, सरचिटणीस भालचंद्र लोहकरे, प्रेरणा वकील उपस्थित होते. दिवा ते ठाणेदरम्यान पाचवा व सहावा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम सुरू आहे. पाचवा व सहावा रेल्वे मार्ग वाढल्याने गाडय़ांची संख्या वाढविणे व त्यांचे नियोजन करण्यासाठी परळ येथे येत्या तीन वर्षांत नवीन टर्मिनस उभारण्यात येणार आहे. दररोज लोकलच्या १२०० फेऱ्यांमधून ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवासी संख्येत दरवर्षी ३५ टक्के वाढ होत असल्याने लोकल वाहतूक आणि वाढत्या प्रवासी संख्येचा ताळमेळ जमविणे रेल्वे प्रशासनाला अवघड होत आहे. ही दरी दरवर्षी भरून काढणे प्रशासनाला तात्काळ शक्य नाही, अशी कबुलीही सक्सेना यांनी दिली.
रेल्वे अपघातात दररोज दहा प्रवासी मरण पावतात. हे टाळण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेच्या एकूण १२ स्थानकांवर (उदा. दादर, ठाकुर्ली, कुर्ला, कांजूरमार्ग, कल्याण) १२० कोटींच्या निधीतून स्कायवॉक, पादचारी पुलांची कामे करण्यात येणार आहेत. रेल्वेच्या विकासात सध्या जमिनीची टंचाई हा मोठा अडथळा आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन, एमएमआरडीए, रस्ते, मेट्रो, मोनोरेल या सर्व प्रकल्प प्रमुखांच्या समन्वयातून रेल्वे प्रशासन आगामी २० वर्षांचा एक विकास आराखडा तयार करणार आहे. या नियोजनातून विरार-वसई, पनवेल-भिवंडी, पनवेल-अलिबाग हे नवीन उपनगरीय कॉरिडॉर सुरू करण्याचा विचार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींची गरज आहे.