सरकार उदासीन..जागेचा प्रश्न प्रलंबित
समस्यांची सवारी
ठाणे रेल्वे स्थानकात दररोज आढळणारा प्रवाशांचा भार विभागला जावा यासाठी कोपरी येथील मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित रेल्वे स्थानक उभारणीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नेमके स्वरूप कसे असावे याचा अभ्यास करण्यासाठी रेल्वे तसेच महापालिका स्तरावर जोरदार तयारी सुरू असली तरी मनोरुग्णालयाची सुमारे १७ एकर क्षेत्रफळाची जागा हस्तांतरित करण्याविषयी आरोग्य मंत्रालय फारसे उत्सुक नसल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भवितव्य पुन्हा एकदा टांगणीला लागले आहे. मनोरुग्णालयालगत असलेला अतिक्रमित भूखंड महापालिका तसेच रेल्वेकडे हस्तांतरित करावा, अशी मागणी या भागातील लोकप्रतिनिधींकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, यासंबंधी ठोस असे आश्वासन मिळत नसल्याने विस्तारित स्थानक खरेच उभारले जाईल का, याविषयी आता सर्वसामान्य ठाणेकरांमध्ये साशंकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर दररोज पडणारा सुमारे पाच लाख प्रवाशांचा भार कमी व्हावा, यासाठी कोपरी येथील मनोरुग्णालयाच्या जागेवर ठाणे टर्मिनस उभारावे, अशी मागणी शिवसेनेचे तत्कालीन खासदार स्वर्गीय प्रकाश परांजपे यांनी सर्वप्रथम लावून धरली. त्यांचे पुत्र तसेच कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांनी मात्र हे टर्मिनस ठाण्याऐवजी आता कल्याण येथे व्हावे, यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कल्याण येथील टर्मिनसचा प्रस्ताव पुढे आला असताना ठाणे महापालिकेने गेल्या वर्षभरापासून विस्तारित ठाणे रेल्वे स्थानक प्रकल्पासाठी अभ्यास सुरू केला आहे. ठाणे शहराच्या नागरीकरणाचा वेग लक्षात घेता सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे स्थानकाला प्रवाशांचा भार पेलवत नाही हे तर स्पष्टच आहे. त्यामुळे ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांसाठी दोन थांबे होऊ शकतील, असा विचार विस्तारित रेल्वे स्थानकाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. सध्या ठाणे रेल्वे स्थानकात अस्तित्वात असलेल्या एक क्रमांकाच्या धर्तीवर कोपरी येथील मनोरुग्णालयालगत विस्तारित स्थानकाचा फलाट उभारण्याची योजना आहे. या स्थानकास लागून बस स्थानक, मोनो, मेट्रोसारख्या वाहतूक व्यवस्थेचे आगार उभारण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने मांडला आहे. शहराच्या पश्चिमेकडे विशेषत कोपरी, वागळे, वर्तकनगर, घोडबंदर मार्गाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना या विस्तारित स्थानकात थांबा देण्याचा हा प्रयत्न आहे. आनंदनगर येथे ट्रामगाडय़ांचा प्रकल्प सुरू करण्यामागे हाच हेतू आहे. यामुळे मूळ स्थानकातील प्रवाशांचा ४० टक्के भार कमी होऊ शकेल, असा दावा केला जात आहे. या प्रकल्पाला रेल्वेनेही तत्वत: मंजुरी दिल्याने ठाणे महापालिकेने सल्लागार नेमून त्याचा अभ्यास सुरू केला आहे. एकीकडे ही सगळी तयारी अतिशय वेगाने सुरू असली तरी दुसरीकडे मात्र मनोरुग्णालयाची जागा पदरात पडेल का, याविषयी मात्र महापालिका स्तरावरही संभ्रमाचे वातावरण आहे. कोपरी येथील मनोरुग्णालयाच्या ७५ एकर जागेपैकी सुमारे १८ एकर जागेवर अतिक्रमण आहे. ही जागा आरोग्य मंत्रालयाने महापालिका तसेच रेल्वेला हस्तांतरित केल्यास त्यावरील अतिक्रमण हलवून विस्तारित रेल्वे स्थानकाचा प्रकल्प उभा करणे शक्य आहे. मात्र, आरोग्य मंत्रालय ही जागा हस्तांतरित करण्यास तयार नसल्याने हा प्रकल्प सध्या तरी अधांतरी आहे. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात या प्रकल्पाविषयी थेट तरतूद होणे अपेक्षित नसले तरी मुंबई रेल विकास महामंडळाच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न झाल्यास ठाणेकरांचा भार कमी होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राज्य सरकार उदासीन
मनोरुग्णालयाच्या जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्न राज्य स्तरावर सोडविणे शक्य असतानाही आतापर्यंत या प्रश्नाकडे सरकारने फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. ठाणे महापालिकेतून शिवसेनेला हद्दपार करण्याची घोषणा करणाऱ्या कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र अपवादानेच दिसून आले आहे. मध्यंतरी पालकमंत्री गणेश नाईक यांनी जागेच्या हस्तांतरणासाठी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. मात्र, आरोग्यमंत्र्यांनीही याविषयी फारशी सकारात्मक भूमिका घेतल्याचे चित्र नाही.
ठाण्यातील विस्तारित स्थानकाला अनास्थेचा खोळंबा
सरकार उदासीन..जागेचा प्रश्न प्रलंबित समस्यांची सवारी ठाणे रेल्वे स्थानकात दररोज आढळणारा प्रवाशांचा भार विभागला जावा यासाठी कोपरी येथील मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित रेल्वे स्थानक उभारणीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नेमके स्वरूप कसे असावे याचा अभ्यास करण्यासाठी रेल्वे तसेच महापालिका स्तरावर जोरदार तयारी
First published on: 13-02-2013 at 12:18 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane expansion of station struct in delay