कळवा येथील रेल्वे स्थानकाच्या फलाटावर सहा दिवसांपूर्वी सापडलेल्या ‘त्या’ अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून त्याची हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी कळवा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मयत आणि आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यात चोरीच्या पैशांवरून वाद झाले होते. यातूनच ही हत्या झाल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
गणेश ऊर्फ गण्या सुखदेव अभंग (२९) असे यातील मृताचे नाव असून त्याच्याविरोधात रेल्वे पोलीस ठाण्यात सोनसाखळी तसेच पाकीट चोरीचे सुमारे ३० ते ३५ गुन्हे दाखल होते.
सहा गुन्ह्य़ांमध्ये त्याला शिक्षाही झाली असून १५ दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. गणेश ऊर्फ गण्या निवृत्ती राखपसरे (४०, रा. भांडुप), मंगेश ऊर्फ मंग्या निवृत्ती राखपसरे (३२, रा. भांडुप), सहदेव ऊर्फ साज्या विठ्ठल लोंढे (२४, रा. कळवा) आणि बादल सदाशिव बोडके (२८, रा. मुंब्रा) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे असून हे सर्वजण रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात मारामारी तसेच चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
४ एप्रिल रोजी कळवा रेल्वे स्थानकाच्या फलाटावर गणेश अभंगचा मृतदेह सापडला होता. या घटनेप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती.
मात्र त्याच्या अंगावर जखमा असल्याने हत्येचा संशय व्यक्त होत होता. दरम्यान, हे प्रकरण कळवा पोलीस ठाण्यात वर्ग होताच पोलीस निरीक्षक आर. डी. मालेकर यांच्या पथकाने तपास करून चौघांना अटक केली.

Story img Loader