ठाणे, कल्याण स्थानके पर्यायाच्या प्रतीक्षेत
प्रवाशांच्या गर्दीने अक्षरश: ओसंडून वाहणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे तसेच कल्याण अशा दोन महत्त्वाच्या स्थानकांवरील प्रवाशांचा भार कमी व्हावा, यासाठी ठाण्यातील विस्तारित स्थानकासह कल्याण येथे नवे टर्मिनस उभारावे, या मागण्यांचे भवितव्य यंदाच्या अर्थसंकल्पावर अवलंबून आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठाकुर्ली येथे रेल्वेच्या माध्यमातून उर्जानिर्मिती केंद्र उभारण्याचा प्रस्ताव २००९ मध्ये पुढे आणला. गेल्या तीन वर्षांत रेल्वे प्रशासनाने यासंबंधी कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे ठाकुर्लीचे नियोजित उर्जानिर्मीती केंद्र सध्यातरी कागदावरच आहे. या केंद्राविषयी रेल्वे मंत्रालय गंभीर नसेल तर त्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रवाशांकरिता टर्मिनस उभारावे, अशा स्वरूपाचा प्रस्ताव आता पुढे आला आहे. मात्र टर्मिनसकरिता या ठिकाणी जागा नाही, अशी भूमिका रेल्वेने घेतली असून या मुद्दय़ावरून या भागात नवा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे टर्मिनस आणि पॉवर प्लॉन्ट यापैकी कोणत्या प्रकल्पाला यंदाच्या अर्थसंकल्पात झुकते माप मिळते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.
विस्तारित स्थानक
ठाणे रेल्वे स्थानकावर दररोज पडणारा सुमारे पाच लाख प्रवाशांचा भार कमी व्हावा, यासाठी कोपरी येथील मनोरुग्णालयाच्या जागेवर ठाणे टर्मिनस उभारावे, अशी मागणी शिवसेनेचे तत्कालीन खासदार स्वर्गीय प्रकाश परांजपे यांनी सर्वप्रथम लावून धरली होती. मनोरुग्णालयाच्या अतिक्रमीत जागेवर मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान स्थानक उभारले जावे आणि कोपरी, वागळे, वर्तकनगर, घोडबंदर अशा दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी या ठिकाणी दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली जावी, असा या स्थानकामागचा विचार आहे. यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी होऊ शकणार आहे. ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांसाठी दोन थांबे होऊ शकतील. रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर या प्रकल्पाच्या सुसाध्यतेविषयी सध्या महापालिकेच्या स्तरावर अभ्यास सुरू आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या माध्यमातून विस्तारित स्थानकासाठी निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी केंद्रीय रेल्वे मंत्रालयास या प्रकल्पाचा थांगपत्ताही नाही, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. ठाणे स्थानकात वेगवेगळ्या स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सध्या रेल्वेने सुरू केला असला तरी गर्दीचा भार कमी व्हावा, यासाठी दिर्घकालीन उपायांची आवश्यकता आहे. त्याविषयी अर्थसंकल्पात काही विचार होतो का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
कल्याण टर्मिनसचा तिढा
खासदार आनंद परांजपे यांनी कल्याण येथे रेल्वे टर्मिनस उभारावे, अशी मागणी लावून धरली आहे. रेल्वेमंत्र्यांकडे यासाठी त्यांनी पाठपुरावाही सुरू केला आहे. मुळात टर्मिनस कोठे उभारायचे याविषयी लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनात एकमत नाही. त्यामुळे गेल्या वर्षी टर्मिनसचा विचारही अर्थसंकल्पात करण्यात आला नव्हता. ठाकुर्ली भागात रेल्वेची भलीमोठी जागा उर्जानिर्मीती केंद्रासाठी आरक्षित आहे. या जागेवर उर्जानिर्मीती केंद्र उभारण्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली होती. त्यानंतर मात्र याविषयी फारसे काही झालेले नाही. त्यामुळे पॉवर प्लॅन्ट नको, टर्मिनस उभारा अशी मागणी येथील लोकप्रतिनिधींनी लावून धरली आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र पॉवर प्लॉन्टसाठी जागा आरक्षित असल्याने टर्मिनस उभारता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या मुद्दय़ावरून या भागातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये संघर्ष उभा ठाकला आहे. कल्याण तसेच आसपासच्या उपनगरांमधील प्रवाशांना पॉवर प्लॉन्टऐवजी टर्मिनसची अधिक गरज आहे, असे खासदार परांजपे यांचे म्हणणे आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात याविषयी नेमका काय विचार होतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
ठाणे-वाशी-नेरुळ-पनवेल या ट्रान्स हार्बर िलकवर प्रवाशांचा भरघोस असा प्रतिसाद मिळत असला तरी या स्थानकांवरील पायाभूत सुविधांचा दुष्काळ अजूनही कायम आहे. ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टय़ास खेटूनच उभ्या असलेल्या या स्थानकांच्या पूर्वेकडील बाजूस तिकीट खिडक्या अद्याप सुरूच करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे औद्योगिक पट्टय़ातील कामगारांना तिकिटांसाठी पश्चिमेकडील बाजूस यावे लागते. याशिवाय नागरी वसाहतींच्या दिशेने असलेल्या तिकीट खिडक्याही पुरेशा प्रमाणात सुरू नसल्याच्या तक्रारी आहेत. नेरुळ-उरण रेल्वेचा प्रकल्प खारफुटी तसेच पर्यावरण मंजुरीच्या फेऱ्यात सापडला आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणारा हा प्रकल्प मार्गी लावण्याचे मोठे आव्हान येत्या काळात सिडको तसेच रेल्वेपुढे असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा