* ११ तलावांचे सुशोभीकरण अद्याप शिल्लक
* २४ तलावांचे रुपडं पालटले
* केंद्रीय पर्यावरण सचिवांनी केली पहाणी
* आर्थिक मदतीची अपेक्षा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तलावांचे शहर अशी ओळख असणाऱ्या ठाण्यातील तलावांच्या सुभोभीकरणासाठी महापालिकेने आता केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मागील तीन वर्षांपासून शहरातील सर्व प्रमुख तालावांच्या सुभोभीकरणासाठी महापालिकेने व्हिजन आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ाच्या माध्यमातून आतापर्यत २४ तलावांच्या सुशोभीकरणाचे काम पुर्ण करण्यात आले असून उरलेल्या तलावांना नेटके रुप देण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
ठाणे शहरात जवळपास ४५ तलाव असून विस्तीर्ण अशा या तलावांमुळे या शहराला एक वेगळी ओळख मिळाली आहे. असे असले तरी मागील काही वर्षांत तलावांच्या देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने अनेक भागांमधील तलावांची दुरावस्था झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सुर व्यक्त होत होता. साधारण तीन वर्षांपासून महापालिकेने महत्वाच्या तलावांचे एक सर्वेषण केले आणि देखभाल, दुरुस्तीसाठी एक आराखडा तयार करण्यात आला. मुळ शहर तसेच आसपासच्या भागात असलेल्या तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी कोटय़वधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. महापालिका निवडणुकांपुर्वी अभियांत्रिकी विभागाने युद्धपातळीवर तलावांच्या सुभोभीकरणाची कामे हाती घेतली. गेल्या दोन वर्षांत ४५ पैकी २४ तलावांचे सुभोभीकरण आणि संवर्धनाचे काम पुर्ण करण्यात आले असून ११ तलावांचे काम अद्याप हाती घ्यायचे आहे. महापालिकेने यापुर्वी वेगवेगळ्या समाजिक संस्था, महाविद्यालये, राज्य सरकारकडून मिळालेला निधी वापरात आणून २४ तलावांचे रुपडं पालटले आहे. आणखी ११ तलावांच्या कामासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वने आणि पर्यावरण विभागाचे अतिरीक्त सचिव शशी शेखर यांनी बुधवारी ठाणे महापालिकेस भेट दिली. यावेळी आयुक्त आर.ए.राजीव आणि शहर अभियंता के.डी.लाला यांनी त्यांना शहरातील तलावांची भेट घडवून आणली. यावेळी उपवन, रायलादेवी तलावांची पहाणी या अधिकाऱ्यांनी केली. तसेच साकेत परिसरात खारफुटींच्या लागवडीची पहाणीही पर्यावरण सचिवांनी केली. तलावांच्या सुशोभीकरण प्रकल्पास केंद्र सरकारमार्फत मदत केली जाईल, असे आश्वासन यावेळी शेखर यांनी दिले. त्यामुळे महापालिका वर्तुळात सध्या आनंदाचे वातावरण असून केंद्राचा निधी मिळाल्यास उर्वरीत तलावांची कामेही युद्धपातळीवर हाती घेण्यात येतील, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane lake waiting for help from center