आता मराठीत लवकरच.. संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! असा मजकूर ठाणे महापालिकेच्या संकेतस्थळावर गेल्या दोन वर्षांपासून आहे. मात्र दरवेळी मराठीचा कैवार घेणाऱ्या शिवसेनेची सत्ता असूनही प्रत्यक्षात महापालिकेचे संकेतस्थळ अजूनही मराठी भाषेत होऊ शकलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या संकेतस्थळावर मराठी भाषा निवडणाऱ्या ठाणेकरांचा भ्रमनिरास होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, लवकरच संकेतस्थळावर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होईल, सध्या त्याचे काम सुरू आहे, अशी माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी दिली.
ठाणे महापालिकेतील वेगवेगळ्या विभागांतील कामांविषयी ठाणेकरांना माहिती मिळावी, या उद्देशातून महापालिका प्रशासनाने संकेतस्थळ तयार केले. मात्र, या संकेतस्थळावर माहितीचे संकलन करून त्याची पाने उपलब्ध करून देण्याच्या जागेची क्षमता कमी होती. परिणामी, सर्वच माहितीचा संच करताना प्रशासनाला अनेक अडचणी येत होत्या. या पाश्र्वभूमीवर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी हे संकेतस्थळ बाद करून त्याऐवजी नवीन संकेतस्थळ तयार करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार एका खासगी कंपनीमार्फत महापालिकेचे नवीन संकेतस्थळ तयार करण्यात आले आणि त्यामध्ये महापालिकेतील सर्वच विभागांच्या माहितीची इत्थंभूत नोंदविण्यात आली. मालमत्ता, आरोग्य, वित्त, शिक्षण, अग्निशमन, बांधकाम, अतिक्रमण, पाणी आदींसह अन्य महत्त्वाच्या विभागांतील कामकाजाची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. महापालिकेतील कामाच्या निविदाप्रक्रियेत पारदर्शकता असावी आणि त्याविषयी ठाणेकरांनाही सविस्तर माहिती मिळावी, यासाठी संकेतस्थळावर सर्वच कामाच्या निविदा देण्यात येत आहेत. या निविदाप्रक्रिया ऑनलाइनद्वारेच राबविण्यात येतात. याशिवाय सर्वसाधारण सभा, स्थायी समिती यांच्यासह अन्य विभागांमधील बैठकीतील विषयपत्रिका आणि त्या बैठकींमध्ये झालेले निर्णय याचीही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाते. तसेच बैठकीचा सविस्तर वृत्तान्तही देण्यात येतो. असे असले तरी संकेतस्थळावर सर्व विभागांची माहिती इंग्रजी भाषेत देण्यात आली असून बातम्या तसेच अन्य काही निविदांची तुरळक माहिती मराठी भाषेत दिसून येते. विशेष म्हणजे, या संकेतस्थळावर इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषांचे पर्याय उपलब्ध असले तरी सध्या त्यापैकी इंग्रजी भाषाच कार्यरत आहे. तसेच ‘आता मराठीत लवकरच.. संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!.’ असा मजकूर मराठी भाषेचा पर्याय निवडल्यानंतर पाहावयास मिळतो. मात्र प्रत्यक्षात ते लवकर अजूनही आलेले नाही. दरम्यान, हे संकेतस्थळ तयार करणाऱ्या कंपनीमार्फतच ते अद्ययावत करण्याचे काम करण्यात येते. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर या कंपनीमार्फत काम केले जाते. संकेतस्थळावर मराठीचा पर्याय उपलब्ध करून देणे जास्त खर्चीक बाब आहे. त्यामुळे त्यांना ते परवडत नाही. आता महापालिकेने स्वतंत्र निविदेमार्फत संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे काम देण्याचा विचार सुरू केला आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.