* राजीव यांच्या अनुपस्थितीत अधिकारी अस्वस्थ
* फिक्सिंगच्या आरोपांना उधाण
* शिवसेना नेत्यांना फुटला कंठ
ठाणे महापालिकेत शिस्तीचा बडगा उगारत गेल्या तीन वर्षांपासून आजी-माजी महापौर, आमदारांसह भल्याभल्यांना जेरीस आणणारे विद्यमान आयुक्त आर. ए. राजीव यांचा कार्यकाळ संपुष्टात येताच ठाण्यातील राजकीय दबंगगिरीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून महापालिकेतील अधिकाऱ्यांवर धमक्या, दबाव, आरोपांच्या फैरी झाडत उघडपणे दंडेली सुरू झाल्यामुळे महापालिकेच्या कामकाजाला एकप्रकारची मरगळ आली आहे. महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना महापौर दालनात झालेली धक्काबुक्की, नगर अभियंता के.डी.लाला यांच्यावर झालेले निविदा ‘फिक्सिंग’चे आरोप, राजीव यांच्या अनुपस्थितीत बांधकाम प्रमाणपत्र तसेच भोगवटा प्रमाणपत्रासाठी नगररचना विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सुरू असलेले दबावतंत्र, मुंब्रा विभागात काम करण्यास अनुत्सुक असलेला अधिकारी वर्ग यामुळे महापालिकेतील कामकाज कमालीचे थंडावले असून राजकीय दंडेलशाहीमुळे काही अधिकारी तर स्वेच्छानिवृत्तीच्या वाटेवर निघाल्याची चर्चा आता रंगली आहे.
ठाणे महापालिकेत गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. गेल्या १५ वर्षांत तर महापालिकेत शिवसेना नेते ठरवतील तीच पूर्वदिशा अशा पद्धतीने कारभार सुरू आहे. असे असताना अभियंता विभागात निविदांचे फिक्सिंग सुरू असल्याचा आरोप करत गेल्या आठवडय़ात सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांनी नगर अभियंता के. डी. लाला यांना लक्ष्य बनविले. ठाण्यातील कंत्राटी कामांमध्ये टक्केवारीचे राजकारण चालते, असा आरोप एकेकाळी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनीच केला होता. त्यानंतरही स्थायी समितीमधील सर्वपक्षीय ‘गोल्डन गँग’ नेहमीच सक्रिय राहिली. या ‘गोल्डन गँग’चा म्होरक्या कोण हे ठाण्यातील राजकीय क्षेत्रातील शेंबडय़ा पोरालाही माहीत आहे. ठाण्यात बिल्डरांना विकासाची परवानगी देताना झाडांच्या कत्तलीचे प्रस्ताव राजरोसपणे मांडले जात आहेत. हे प्रस्ताव मंजूर करताना सर्वपक्षीय हितसंबंध कसे संभाळले गेले, याची खमंग चर्चाही सध्या महापालिका वर्तुळात सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर के. डी. लाला यांच्यावर फिक्सिंगचे आरोप करणारे शिवसेनेचे नेते इतके दिवस गप्प का होते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
राजीव यांच्यापुढे मात्र गुपचिळी
गेल्या तीन वर्षांपासून ठाणे महापालिकेत राजीव यांचा एकहाती वरचष्मा राहिल्याचे चित्र होते. राजीव सभागृहात असताना अभियंता विभागाविरोधात साधा ‘ब्र’ काढण्याची हिंमतही शिवसेना सदस्यांना दाखविता आली नव्हती. जवाहरलाल नेहरू विकास योजनेतील कोटय़वधींची वादग्रस्त कामे शिवसेनेचे बहुमत असताना स्थायी समितीत मंजूर करण्यात आली. सॅटीससारखा प्रकल्पही वाढीव रकमेमुळे वादात सापडला, तर जलवाहिन्याच्या टाकण्याची कोटय़वधी रुपयांची कामेही अशाच वाढीव टक्केवारीमुळे चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहेत. वाढीव रकमांची कंत्राटे बिनधोकपणे मंजूर होत असताना सत्ताधारी म्हणून शिवसेनेच्या सदस्यांनी त्यास विरोध का केला नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. राजीव यांच्यापुढे माना तुकविणाऱ्या नगरसेवकांना आता अचानक आवाज फुटला असून त्याचा त्रास अधिकाऱ्यांना होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.

स्वेच्छानिवृत्तीच्या दिशेने वाटचाल
राजीव यांचा कार्यकाळ संपुष्टात येताच महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचे वेध लागले आहेत. नगररचना विभागातील वरिष्ठ अधिकारी सुहास सामंत यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला असून के. डी. लाला यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे येत आहे. शीळ इमारत दुर्घटनेनंतर महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अटक सत्र सुरू झाल्यामुळे या भागात काम करण्यास एकही अधिकारी इच्छुक नाही. सार्वजनिक बांधकाम विभागात एका अधिकाऱ्याकडे पाच विभागांचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे, तर कनिष्ठ अभियंत्यांकडे अनेक विभागांचे ओझे आहे. एप्रिल महिन्यापासून राजीव सुट्टीवर असल्यामुळे शामसुंदर पाटील यांच्याकडे आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार आहे. तर नगररचना विभागात जितेंद्र भोपळे यांच्याकडे प्रभारी जबाबदारी आहे. हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी महापालिकेतील अस्थिर परिस्थितीमुळे महत्त्वाचे निर्णय घेताना चाचपडताना दिसत आहेत. एकूणच ठाणे महापालिकेत मरगळ पसरल्याचे चित्र दिसत आहे.

Story img Loader