पुरामुळे विस्कळीत झालेले जम्मू-काश्मीरमधील जनजीवन आता हळूहळू पूर्ववत होत असले तरी अक्षरश: उद्ध्वस्त झालेल्या तेथील हजारो कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरायला अजून बराच वेळ जाणार आहे. पुनर्वसनाची ही प्रक्रिया दीर्घकालीन असून लष्कर आणि प्रशासनाबरोबरच विविध स्वयंसेवी संस्था त्यासाठी कार्यरत आहेत. त्यात शीख बांधवांनीही आपला वाटा उचलला आहे. देशभरातील ४५ शीख बांधवांनी जम्मूमधील उधमपूरजवळील मगुरनगर, अलुचिबाग, राजबाग, जव्हारबाग आदी गावांमधील तब्बल १७०० कुटुंबे दत्तक घेतली आहेत. भाई घनैयाजी सेवा मिशन या संस्थेच्या वतीने हे काम सुरू असून समाजसेवेने भारलेल्या या सरदारांचे नेतृत्व मुंबईतील भूपिंदरसिंग कोहली करीत आहेत.
आपली स्टेट बँकेतील नोकरी सांभाळून गेली ३५ वर्षे आरोग्य, शिक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीला धावून जाणाऱ्या कोहलींनी आता निवृत्तीनंतर समाजसेवेस पूर्णपणे वाहून घेतले आहे. त्यामुळेच जम्मू-काश्मीर परिसरात पुराने थैमान घातल्याचे कळताच भाई घनैयाजी सेवा मिशन या संघटनेच्या माध्यमातून ते रहिवाशांच्या मदतीला धावले. जम्मू येथील त्रिकुटानगर गुरुद्वारातून ते त्यांची पुनर्वसन मोहीम राबवीत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेजिंग येथे केले जाते. त्यात अन्नपदार्थ, ब्लँकेट्स, चादरी, बॉडीवॉर्मर, प्रसाधने, सुकामेवा आदींचा समावेश आहे. तिथून १२ तासांवर असलेल्या उधमपूर येथील लष्कराच्या छावणीत या वस्तू आणून त्यांचे वितरण केले जाते.
आता पूर ओसरला असला तरी कुटुंबांना सावरायला बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे या शीख बांधवांनी किमान एक वर्ष तिथे पुनर्वसन मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. उपरोक्त गावांचे सर्वेक्षण करून त्यांनी तेथील प्रत्येक कुटुंबाची नोंद केली आहे. पूरग्रस्त कुटुंबातील व्यक्ती पुन्हा स्वत:च्या पायावर उभी राहीपर्यंत त्यांना प्राथमिक सुविधा पुरविणार आहोत. गावांमधील एकूण १७०० कुटुंबीयांपैकी १५० लोक अत्यंत गरजू आहेत. त्यांना किमान एक वर्ष दरमहा विशिष्ट रक्कम मदत देण्यात येईल, अशी माहिती कोहली यांनी वृत्तान्तला दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा