मुंब्रा येथील बाह्य़वळण महामार्गावर रविवारी पहाटे मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंनी कंटेनर अडवून चालकाच्या खिशातील साडेनऊ हजार रुपयांची रोकड आणि कागदपत्रे लुटून नेली. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर वाहनचालकांना लुटण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.
नवी मुंबई येथील सानपाडा परिसरातील प्रवीण सुदाम बच्चे (२६) राहात असून ते व्यवसायाने वाहनचालक आहेत. रविवारी पहाटे ते भिवंडी येथे कंटेनर घेऊन निघाले होते. दरम्यान मुंब्रा बाह्य़वळण महामार्गावरील टोलनाका ओलांडून पुढे आले असता मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांचा कंटनेर अडविला आणि कंटेनरच्या केबिनमध्ये शिरले. एकाने प्रवीणच्या पाठीला चावा घेऊन जखमी केले तर दुसऱ्याने प्रवीणच्या पॅन्टचा मागील खिसा चाकूने कापून ९,५०० रुपयांची रोकड, वाहन परवाना, आधार कार्डची झेरॉक्स आणि चलन काढून घेतले. या घटनेनंतर दोघा लुटारूंनी तेथून पळ काढला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर वाहने अडवून चाकूचा धाक दाखवत वाहनचालकांकडील ऐवज लुटण्याचे प्रकार वाढू लागल्याचे दिसून येते. या घटनांमुळे महामार्गावर वाहनचालकांना लुटणारी टोळी कार्यरत झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.