वाशी रेल्वे स्थानक परिसरात भाडे मिळवण्यासाठी रिक्षाचालकांची चढाओढ लागत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. ती चढाओढ बंद करण्यासाठी व रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी वाशी वाहतूक पोलिसांनी प्रयत्न सुरू केले असून, मुजोर रिक्षाचालक आता वठणीवर येऊ लागले आहेत.
वाशी रेल्वे स्थानकात मुजोर रिक्षाचालकांमुळे प्रामाणिकपणे रांगेतून प्रवासी भाडे स्वीकारणाऱ्या रिक्षाचालकांना भरुदड सहन करावा लागत होता. वाशी रेल्वे स्थानक परिसरात काही मुजोर रिक्षाचालक रांगेत उभे न राहता प्रवासी भाडे घेण्यासाठी कुठेही आडव्या तिडव्या पद्धतीने रिक्षा उभ्या करण्यात येत होत्या. परिणामी या भागात वाहतूक कोंडी होत असून, पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. या बाबत अनेकदा वाहतूक पोलिसांकडे रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांना चाप लावण्यासाठी कठोर पावले उचलली असून, सकाळी सातपासून रात्री नऊ वाजेपर्यंत ठरावीक अंतराने पोलीस कर्मचारी वाशी रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षातळाजवळ तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे मुजोर रिक्षाचालकांनाही शिस्त लागली असून, वाशी रेल्वे स्थानकानजीक सिडकोने नियोजन करून दिलेल्या ठिकाणी रिक्षाचालक प्रवाशांना उतरवत आहेत.