प्रेमात आकंठ बुडालेले प्रेमवीर कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. याचाच प्रत्यय देणारी एक घटना ठाण्यात घडली आहे. मुलीच्या लग्नासाठी पालकांनी सोन्याचे दागिने तयार केले आणि तिच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याने ती लग्न करण्यास तयार नव्हती. त्यामुळे लग्न टाळण्यासाठी तिने स्वत:च्या घरात चोरीचा बनाव रचला. दागिनेच नसतील तर लग्न होणारच नाही, असा त्यामागे तिचा हेतू होता. मात्र प्रियकराच्या प्रामाणिकपणामुळे तिचा बनाव उघड होऊन तिचे सर्वच बेत फसले.
ठाणे येथील वागळे इस्टेट भागात एक १७ वर्षीय मुलगी राहत असून तिचे याच परिसरातील एका २१ वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्यांचा भविष्यात लग्न करण्याचा बेत होता. याविषयी तिच्या पालकांना समजले होते. त्यामुळे ती अल्पवयीन असतानाही पालकांनी तिच्या लग्नाची तयारी सुरू केली होती. लग्नासाठी सुमारे साडेतीन लाख रुपयांचे दागिने बनविले होते. तसेच लग्नासाठी तिच्याकडे तगादा लावला होता. मात्र, त्या तरूणाच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने ती लग्नास तयार नव्हती. त्यामुळे लग्न टाळण्याचा विचार सुरू असतानाच तिच्या डोक्यात चोरीची कल्पना आली. दागिनेच नसतील तर लग्न होणारच नाही आणि लग्नानंतर आर्थिक चणचणही भासणार नाही, या विचारानेच तिने चोरीचा बनाव रचला. गॅस दुरुस्तीच्या बहाण्याने दोन एजंटांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला. घरातून गॅस दुरुस्तीसाठी दूरध्वनी आल्याचे एजंटाने सांगितले. पण घरात एकटीच असल्याने त्यांना आपण परत जाण्यास सांगितले आणि बाहेर येऊन शेजारी घरी आहेत का हे पाहत असताना एका एजंटाने संमोहित केले. त्यानंतर घरात शिरून किचनमध्ये ठेवलेले तीन लाख ७२ हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन पळून गेले, असा बनाव तिने रचला होता.
टीव्ही चॅनेलवरील गुन्हेविषयक मालिकेतून तिला ही कल्पना सुचली होती. चोरलेल्या दागिन्यांची पिशवी तिने प्रियकराच्या आईकडे ठेवण्यास दिली होती. मात्र त्या पिशवीत काय आहे, याविषयी त्यांना काहीच कल्पना नव्हती. या घटनेप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला होता. असे असतानाच प्रियकराला प्रेयसीच्या या प्रकाराबाबत माहिती मिळाल्याने तो अस्वस्थ झाला. त्याच्या एका मित्राची पोलिसात ओळख होती. त्या मित्राच्या मदतीने त्याने ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.