नियोजनाच्या आघाडीवर सावळागोंधळ असलेल्या ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमध्ये वाहनतळांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांना अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. ठाणे महापालिकेने सुधारित विकास आराखडय़ात तब्बल ३० भूखंड वाहनतळांसाठी आरक्षित ठेवले आहेत. ठाणे शहरात वाहनतळांसाठी पुरेशी जागा नसल्याने रस्त्यांच्या कडेला वाहने उभे करण्याचे प्रकार सर्रासपणे घडतात. यामुळे प्रमुख रस्त्यांवर वाहनांची कोंडी होत असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे विकास आराखडय़ात आरक्षित असलेल्या वाहनतळांच्या भूखंडांचा लवकरात लवकर विकास केला जावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ३० पैकी तब्बल २२ भूखंडांवर अतिक्रमण झाले असून एक भूखंड मोकळा, तर दोन ठिकाणी वाहनतळांचा विकास झाला आहे. उर्वरित सगळ्या भूखंडांवर बेकायदा चाळी, झोपडपट्टया तर काही ठिकाणी फेरीवाले, टपऱ्यांचे अतिक्रमण झाले आहे. यामुळे शहरातील पार्किंगचा प्रश्न भविष्यात आणखी गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे.  २० वर्षांनंतर प्रत्येक शहराच्या विकास आराखडय़ात बदल करावा, असा शासनाचा नियम आहे. महापालिकेने १९९३ मध्ये ठाणे शहराचा विकास आराखडा राज्य सरकारकडे सादर केला. सरकारने या आराखडय़ास तब्बल दहा वर्षांनी मान्यता दिली. तोवर मूळ विकास आराखडय़ात आरक्षित मैदाने, उद्याने यांसारखे सार्वजनिक वापराचे भूखंड माफियांनी गिळले आणि त्यावर बेकायदा बांधकामांचे इमले उभे केले. त्यामुळे महापालिकेच्या मूळ विकास आराखडय़ाचे एव्हाना बट्टयाबोळ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दहा वर्षांपूर्वी या विकास आराखडय़ास राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतरही महापालिकेस हे आरक्षित भूखंड संभाळता आलेले नाहीत. अतिक्रमण विरोधी पथकाच्या नाकर्तेपणामुळे अनेक सुविधा भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे शहराचे नियोजन कोलमडून पडले आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांसाठी महापालिकेने तब्बल ३० ठिकाणी वाहनतळ उभारण्यासाठी भूखंड आरक्षित ठेवली होती. येथील रेल्वे स्थानक परिसरातही अशा स्वरूपाचे आरक्षण ठेवण्यात आले होते. त्यापैकी ठाणे पूर्वेकडे आणि मुंब्रा परिसरात सुसज्ज असे वाहनतळ उभारणे शक्य झाले आहे. मुंब्रा भागात वाहनतळाच्या भूखंडांवर झालेले मोठय़ा स्वरूपाचे अतिक्रमण तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी पुढाकार घेऊन हटवली आणि त्यावर वाहनतळाची निर्मिती केली. उर्वरित २२ भूखंडांवर झालेले अतिक्रमण कधी हटविले जाणार, असा सवाल केला जात आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला वागळे परिसरात वाहनतळांच्या भूखंडावर जागोजागी बेकायदा चाळी उभ्या आहेत. ढोकाळी परिसरातील भूखंडावर आझादनगर झोपडपट्टी उभी राहिली आहे. नौपाडा पोलीस ठाणे तसेच ठाणे पोस्ट ऑफिस लगतच्या भूखंडावर वाहनतळ उभारण्याच्या प्रस्तावावर काम सुरू आहे.  तरी आधीच जटिल असलेला वाहनतळांचा प्रश्न आणखी गंभीर रूप धारण करण्याची भीती व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा