लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर ठाणे पोलीस शहरातील सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्याच्या कामात व्यस्त झाले असून याच संधीचा फायदा घेत शहरातील वेगवेगळ्या भागात सोनसाखळी चोर, भामटे तसेच घरफोडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे चित्र आहे. मोटारसायकलवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळणे, भूलथापा देऊन दागिने लंपास करणे आणि बंद घरांचा कडीकोयंडा तोडून किमती ऐवज लंपास करणे अशा घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होऊ लागली असून ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये दिवसाला दोन-तीन अशा स्वरूपाच्या घटनांची नोंद होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच अशा घटनांना पायबंद घालण्याचे दुहेरी आव्हान ठाणे पोलिसांपुढे उभे राहिले आहे.
ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर आदी शहरे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येत असून या शहरांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत आहे. बेकायदेशीर शस्त्रांचा शोध घेणे, परवानाधारक शस्त्रे गोळा करणे, गुंडापुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे तसेच पक्षांच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी बंदोबस्त पुरविणे अशा स्वरूपाच्या कामात ठाणे पोलीस व्यस्त आहेत. मात्र, या संधीचा फायदा सोनसाखळी चोर, भामटे आणि घरफोडे घेऊ लागले आहेत. यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे घडत होते, पण त्याचे प्रमाण कमी होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या गुन्ह्य़ांच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी भागातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दिवसाला दोन ते तीन अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांची नोंद होऊ लागली आहे. कळवा परिसरात राहणाऱ्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुरेखा खातू या चार दिवसांपूर्वी रिक्षातून घरी परतत होत्या. त्यावेळी रिक्षाचालकाने भाडे घेण्याच्या निमित्ताने रिक्षा थांबवून त्यांना धक्का मारला आणि त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. त्यांनी प्रतिकार केला, पण त्या रिक्षासोबत फरफटत गेल्या. त्यामुळे सोनसाखळी तुटून रिक्षाचालकाच्या हातात गेली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुरुवारी सोनसाखळी चोरीचे चार, घरफोडीचे दोन, फसवणुकीचा एक आणि वाहनचोरीचा एक अशा गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. या वाढत्या घटना ऐन निवडणुकीच्या काळात ठाणे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader