महाराष्ट्र पोलीस सेवेत असलेले सहाय्यक फौजदार व पोलीस हवालदार यांची अलीकडेच परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या सुमारे एक हजारांपेक्षा जास्त पोलिसांना पोलीस उपनिरीक्षक या पदाची पदोन्नती देण्यात आली. ठाणे ग्रामीणमधील २४ पोलीस कर्मचारी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरिक्षक झाले. मात्र उत्तीर्ण झालेले हे सर्व पोलीस कर्मचारी ५३ ते ५७ वर्षे वयोगटातील असून या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीनंतर बदल्या ठाणे ग्रामीणमधून रायगड ग्रामीणमध्ये करण्यात आल्या आहेत. अनेकजणांना डायबिटीस, उच्च रक्तदान, मणक्याचे आजार अशा अनेक व्याधींनी पछाडलेले असताना त्यांच्या बदल्या अन्य जिल्ह्य़ांत झाल्याने हे सर्व पोलीस कर्मचारी बढती मिळूनही नाराज झालेले आहेत.
विशेष म्हणजे हीच परीक्षा पास होऊन पदोन्नती मिळालेले शहरी विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र झुकते माप देत त्यांना त्याच जिल्ह्य़ातील शहरी भागात ठेवले आहे. तर ठाणे ग्राणीण मधील पदोन्नती मिळालेल्या २४ पोलीस कर्मचाऱ्यांना रायगड ग्राणीण जिल्ह्य़ाची वाट दाखविली आहे.
तर रायगड ग्रामीण जिल्ह्य़ातील पदोन्नती मिळालेल्यांना ठाणे ग्रामीणमध्ये हजर होण्याचे आदेश दिले आहेत. अनेकांची सेवा ३३ ते ३६ वर्षे झाली आहे. अनेकांची मुले उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेली आहेत. तर अनेकांवर मुलांच्या लग्नाची जबाबदारी आहे. त्यामुळे बदलीच्या ठिकाणी कुटुंब हलविता येत नाही. अशा अनेक अडचणींमध्ये हे पोलीस कर्मचारी सापडले आहेत. दरम्यान निव्वळ त्रास देण्याच्या हेतूने जिल्ह्य़ाच्या बाहेर बदल्या करण्यात आलेल्या आहेत. असे पदोन्नती मिळालेल्यांनी बोलून दाखविले.
त्याचप्रमाणे नवी मुंबई, ठाणे, पुणे तसेच अन्य शहरातील पोलीस आयुक्त परिसरातील बढती मिळालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अन्य जिल्ह्य़ात पाठविण्यात आले नाही. त्यांना त्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे. हा दुजाभाव कशासाठी असाही सवाल या पोलीस कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Story img Loader