ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे स्थलांतर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या रेन्टल हाउसिंग योजनेच्या घरांमध्ये करण्याची योजना प्रशासकीय प्रक्रियेत काहीशी वेळकाढूपणाची ठरत असतानाच वर्तकनगर परिसरातील पोलीस वसाहतींमधील रहिवाशांचे पुनर्वसनही याच घरांमध्ये करण्याची मागणी करत ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी महापालिकेला गुगली टाकली आहे. वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीत सद्यस्थितीत सुमारे ५५० कुटुंबे वास्तव्य करत आहेत. या इमारतीही धोकादायक ठरल्यामुळे पोलीस कुटुंबांचे स्थलांतर करणे अत्यावश्यक आहे. एमएमआरडीएच्या घरांमध्ये स्थलांतर करताना ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील नेमक्या किती कुटुंबांना प्राधान्य द्यायचे याविषयी अजूनही प्रशासनात गोंधळाची स्थिती कायम आहे. असे असताना पोलीस कुटुंबांना एमएमआरडीएच्या घरात १० टक्के आरक्षण द्या, अशी मागणी पोलीस आयुक्त के.पी.रघुवंशी यांनी केल्याने महापालिका अधिकारी चक्रावून गेले आहेत.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सांगण्यावरून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वर्तकनगर भागातील ‘दोस्ती विहार’ प्रकल्पातील सुमारे १४०० घरांचे हस्तांतरण महापालिकेकडे केले आहे. या घरांमध्ये ठाण्यासह मुंब्रा, कौसा परिसरातील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन अपेक्षित आहे. मात्र आपल्या पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या वर्तकनगर परिसरात ‘मुंब्रा’ वसविण्यास शिवसेनेने विरोध सुरू केला असून वागळे, नौपाडय़ातील रहिवाशांचे येथे स्थलांतर करा, अशी भूमिका या पक्षाच्या नेत्यांनी घेतली आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा या परिसरात सुमारे ११०० इमारती धोकादायक असून त्यापैकी ५७ इमारती या अतिधोकादायक आहेत. शीळ पाठोपाठ मुंब्रा येथे आणखी एक इमारत कोसळल्यामुळे या ५७ इमारतींमधील रहिवाशांचे स्थलांतर आवश्यक बनले आहे. त्यासाठी ‘दोस्ती विहार’ येथे १४०० कुटुबांचे स्थलांतर करून त्यांच्याकडून प्रतिमहिना दोन हजार रुपये इतके भाडे वसूल करण्याचा ठरावही राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. असे असले तरी अतिधोकादायक इमारतींमधील कुटुबांची संख्या १४०० पेक्षा अधिक असल्यामुळे वर्तकनगर येथे नेमके कोणत्या भागातील रहिवाशांचे स्थलांतर करायचे, यावरून सध्या ठाण्यात राजकारण तापले आहे. अशा परिस्थितीत वर्तकनगर पोलीस वसाहतीमधील ५५० कुटुबांच्या स्थलांतराचा प्रश्न मांडण्यात आल्याने महापालिकेपुढील अडचणी वाढल्या आहेत.
पोलीस आयुक्त आक्रमक
वर्ततनगर भागात म्हाडाच्या पुढाकाराने पोलिसांसाठी इमारती उभारण्यात आल्या असून सुमारे ४० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या इमारतींची सध्या दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मध्यंतरी या इमारतींची पहाणी केली आणि तेथील कुटुबांना तातडीने इतरत्र हलवावे, अशा सूचना पोलीस आयुक्तांना केल्या. मात्र या कुटुंबांच्या स्थलांतरासाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्यामुळे ही सर्व कुटुंबे जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहात आहेत. ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे एमएमआरडीएच्या घरांमध्ये स्थलांतराची चर्चा सुरू होताच पोलीस आयुक्त के.पी.रघुवंशी यांनी नेमकी वेळ साधत या घरांपैकी १० टक्के घरे ही पोलिसांच्या कुटुंबांसाठी आरक्षित ठेवा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. वर्तकनगर, ठाणे येथील पोलीस कर्मचाऱ्यांची मुले याच भागात शिक्षण घेत असल्यामुळे हे कर्मचारी उल्हासनगर, भिवंडी, कल्याण या भागात पोलीस वसाहतींमध्ये रहावयास जाण्यास तयार नसतात. त्यामुळे एमएमआरडीएच्या रेंटल हाउसिंग प्रकल्पातील १६० चौरस फुटांची दोन घरे एकत्रित करून ३२० चौरस फुटांची एक सदनिका पोलीस निवासस्थानासाठी दिली जावी, अशी मागणी रघुवंशी यांनी केली आहे.
ठाणे पोलिसांनाही हवीत एमएमआरडीएची घरे; पोलीस आयुक्तांच्या गुगलीने महापालिका चक्रावली
ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे स्थलांतर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या रेन्टल हाउसिंग योजनेच्या घरांमध्ये करण्याची योजना प्रशासकीय प्रक्रियेत काहीशी वेळकाढूपणाची ठरत असतानाच वर्तकनगर परिसरातील पोलीस वसाहतींमधील रहिवाशांचे पुनर्वसनही याच घरांमध्ये करण्याची मागणी करत ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी महापालिकेला गुगली टाकली आहे. व
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-07-2013 at 12:09 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane police want mmrda houses