जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ठाणेप्रवाह’ प्रणाली कार्यान्वित
नागरिकांचे हेलपाटे अन् कर्मचाऱ्यांचा त्रास वाचणार
लोकसंख्येनुसार देशातील सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या ठाण्यातील प्रशासकीय व्यवस्थेत पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ठाणे प्रवाह’ ही नवी संगणकीयप्रणाली लागू करण्यात आली आहे. या अभिनव प्रणालीनुसार आता नागरिकांना विविध कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या अर्जाचे, फायलींचे नेमके काय झाले, हे घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून पाहता येणार आहे. गेल्या जून महिन्यापासून टप्प्याटप्प्याने ही प्रणाली अमलात आणण्यात आली असून आता जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग त्यास जोडण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांचे हेलपाटे कमी होतील, कर्मचारी-अधिकाऱ्यांचा वेळ वाचेल आणि या दोहोंमध्ये समन्वय साधला जाईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांना thanepravah.com या संकेतस्थळावरील फाइल जर्नी मॉनिटरिंग सिस्टीममुळे त्यांच्या प्रकरणांचा मागोवा घेता येणार आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये संगणकीकरण येऊन आता बरीच वर्षे झाली. आवक-जावक विभागही त्यास अपवाद नाही. मात्र या पूर्वीच्या पद्धतीत टपाल नोंदणी व्हायची, पण अर्जदारास केवळ अर्जाच्या फोटो प्रतीवर पोहोच मिळत होती. संबंधित विभागात आपण दिलेल्या अर्जाचे नेमके काय झाले. तो अर्ज आता नेमका कोणत्या विभागात आहे, हे त्याला समजण्याची कोणतीही सोय त्यात नव्हती. त्यामुळे कार्यालयात हेलपाटे घालून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यास भेटण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता.
जिल्हाधिकारी कार्यालयाने लागू केलेल्या या नव्या संगणकीय प्रणालीमुळे नागरिकांना आपण केलेल्या अर्जाचे नेमके काय झाले, तो आता कोणत्या अधिकाऱ्याकडे, कुठल्या टेबलवर आहे, हे इंटरनेटच्या माध्यमातून पाहता येणार आहे. शिवाय नागरिकांचे असे परस्पर ऑनलाइन शंकानिरसन होणार असल्याने कर्मचाऱ्यांचाही वेळ आणि श्रम वाचणार आहेत.

फाइलचा प्रवास समजणार
सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक विभागात येणारे सर्व अर्ज अथवा फाईल्सचे बारकोडिंग होऊन संबंधितांस एक १४ आकडी नंबर दिला जातो. त्यानंतर ती फाइल संबंधित अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर त्याच्या इनबॉक्समध्ये त्याची नोंद होते. प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून फाइल जसजसा प्रवास करेल, तसतशी तिची नोंद प्रणालीत घेतली जाते. संबंधित व्यक्तीने ‘ठाणे प्रवाह’च्या संकेतस्थळास भेट देऊन केवळ आपला कोडनंबर टाकला की त्याला आपल्या कामाची प्रगती कळू शकते. विशिष्ट दिवशी आपली फाइल नेमकी कोणाकडे आहे, हेही त्याला कळू शकते. त्यामुळे नेमक्या अधिकाऱ्याची भेट घेणे किंवा त्या विभागाशी संपर्क साधणे अर्जदारास शक्य होणार आहे.  इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात कुठूनही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपल्या अर्जाचे अथवा फायलीचे काय झाले हे नागरिकांना पाहता येईल. मात्र जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात इंटरनेट सुविधेचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सध्या सर्व तहसील कार्यालयांमध्ये ‘ठाणे प्रवाह’प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्य़ातील अन्य ६० ठिकाणी नागरिकांना ठाणे प्रवाहवर आपल्या कामाचा प्रवास पाहण्याची सोय करून दिली जात आहे.