औटघटकेच्या ‘टीएमटी’ सभापतीपदावरून ठाणे महापालिकेत रंगलेल्या फाटाफुटीच्या राजकारणामुळे सोमवारी तक्रार दिनाचे निमित्त साधून मुख्यालयात प्रवेश मिळावा म्हणून मोठय़ा संख्येने जमलेल्या सर्वसामान्य ठाणेकर नागरिकांना हात हलवतच परत फिरावे लागले.
ठाणे महापालिका परिवहन सभापतीपदाची मुदत येत्या दोन महिन्यांत संपत असून, एवढय़ा अल्पमुदतीसाठी होत असलेली निवडणूक ठाण्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी कमालीची प्रतिष्ठेची केली होती. सभापतीपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्याने बंडखोर उमेदवाराला मतदान करत शिवसेनेला धक्का दिला आणि मुख्यालयात पुन्हा एकदा हाणामाऱ्या झाल्या. आपल्या तक्रारींचे निवारण व्हावे म्हणून सकाळपासून महापालिका मुख्यालयाबाहेर तिष्ठत असलेल्या सर्वसामान्य ठाणेकरांचे या हाणामाऱ्यांमुळे अक्षरश: हाल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
शिवसेनेचे परिवहन समिती सदस्य शैलेश भगत यांना गळाला लावत राष्ट्रवादीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने गेल्या आठवडय़ात युती आणि आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने ठाण्याच्या प्रमुख रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रडतखडत सुरू असलेली ‘टीएमटी’ची सेवा सुधारावी यासाठी अपवादानेच रस्त्यावर उतरणारे ठाणेकर नेते सभापतीपदासाठी मात्र एकमेकांच्या जिवावर उठल्याचे चित्र गेल्या आठवडय़ात दिसून आले होते. त्याचा प्रत्यय पुन्हा सोमवारी दिसून आला.
तक्रारदिनी तक्रारदार बाहेर
नागरिकांच्या तक्रारींना वाव मिळावा यासाठी आयुक्त असीम गुप्ता यांनी सोमवारी ‘मुख्यालय दिन’ निश्चित केला होता. परंतु गेल्या आठवडय़ात राजकीय कार्यकर्त्यांनी मुख्यालयाच्या आवारात धुडगूस घातल्याने सुरक्षेच्या कारणास्तव एकाही कार्यकर्त्यांला मुख्यालयात जाऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली होती. त्यामुळे तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांना मुख्यालयाबाहेर तिष्ठत ठेवण्यात आले. विशेष म्हणजे इतर राजकीय नेत्यांसोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र मुख्यालयात प्रवेश होता. शिवसेनेला धक्का दिल्याच्या आनंदात मुख्यालयात आलेले जितेंद्र आव्हाडांसोबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे जथ्थेच्या जथ्थे दाखल झाले. तक्रार निवारण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना मात्र मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अडविण्यात येत होते. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत होता. याप्रकरणी जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना प्रवेश दिला नाही, असे सांगितले. याविषयी जितेंद्र आव्हाडांना विचारले असता ‘ठाणेकर नागरिकांच्या प्रश्नांचे नंतर बघू’, असे कोडगे उत्तर त्यांनी दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा