ग्राहकांची खरेदीसाठी ओसंडून वाहणारी गर्दी, खिशाला सोयीच्या ठरणाऱ्या भरघोस सवलती, खरेदीसोबत बंपर बक्षिसे आणि ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ फेम अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या उपस्थितीत विजेत्यांचा होणारा सन्मान, असा सगळा खरेदीमय उत्साह प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी ठाण्याच्या गोखले मार्गावर पाहावयास मिळाला. ‘लोकसत्ता ठाणे फेस्टिव्हल’च्या बक्षीस वितरण सोहळ्याविषयी स्पर्धकांमध्ये असलेले कुतूहल शनिवारपाठोपाठ रविवारीही दिसून आले. स्पृहा जोशीच्या उपस्थितीतीमुळे या उत्साहाला महोत्सवाचा थाट आला आणि ‘एका लग्नाची..’तील आवडत्या ईशासोबत ग्राहकांनी बक्षिसांची लयलूट केली. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला २४ जानेवारीपासून मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली. ग्राहकांनी या महोत्सवाला उत्साही प्रतिसाद देत मोठय़ा संख्येने विविध दुकानांमधून खरेदीचा उच्चांक नोंदवला. ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील ७५ हून अधिक गृहोपयोगी वस्तूंच्या दुकानांमधून हा फेस्टिव्हल साजरा होत असून, या महोत्सवात २५० रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भाग्यवान सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी ‘लोकसत्ता’ने उपलब्ध करून दिली आहे. या महोत्सवातील पहिल्या दिवसाचा बक्षीस समारंभ ठाण्यात संपन्न झाला. त्यावेळी स्पृहा जोशी यांच्यासह ‘वामन हरी पेठे सन्स’च्या संचालिका सोनाली पेठे आणि ‘लोकसत्ता’च्या जाहिरात विभागाचे महाव्यवस्थापक तरुणकुमार तिवाडी उपस्थित होते.

Story img Loader