ऊर्जेच्या नव्या स्रोतांचा शोध, संरक्षण आणि संवर्धन यावर नव्या पिढीने काम करावे, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये या विषयावर आधारित प्रकल्प सादर करण्यात येणार आहे. यंदा पुण्यातील संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जातेगाव येथे होणाऱ्या या परिषदेमध्ये ठाण्यातील दहा शाळा ऊर्जा संवर्धनाचा संदेश देणारे प्रकल्प सादर करणार आहेत.   
केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे यंदाचे २१ वे वर्ष असून महाराष्ट्र राज्यात या परिषदेच्या समन्वयक पदाची जबाबदारी ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्ट सांभाळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्य़ांमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत जिल्हास्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे २५०० बालवैज्ञानिक गटांनी आपले संशोधनात्मक प्रबोधन सादर केले. २४५ प्रकल्पांची पूर्व राज्यस्तरीय चाळणी फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यामधील ६८ प्रकल्पांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यापैकी ठाण्यातील लोकपूरम पब्लिक स्कूल, श्रीरंग विद्यालय इंग्रजी माध्यम शाळा, श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल या तीन शाळांचे प्रत्येकी दोन प्रकल्प, तर एस.व्ही.पी.टी. सरस्वती विद्यालय, बेडेकर विद्यामंदिर, ठाणे महापालिका शाळा क्र. २३, चिल्ड्रेन टेक सेंटर या शाळांचे प्रत्येकी एक अशा दहा प्रकल्पांचा यात समावेश करण्यात आला आहे.

Story img Loader