ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची कोंडी कमी व्हावी, यासाठी गोखले मार्गावर तीनहात नाका ते रेल्वे स्थानकाच्या दिशेने थेट भुयारी मार्ग उभारण्याचा तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी आखलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प निधीच्या कमतरतेअभावी गुंडाळण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. ठाणे शहराच्या पश्चिमेकडून दररोज हजारोंच्या संख्येने लहान-मोठी वाहने रेल्वे स्थानकाच्या दिशेने ये-जा करत असतात. या वाहनांसाठी वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी राजीव यांनी हा भुयारी मार्ग प्रस्तावित केला होता. मात्र, राजीव यांची पाठ वळताच हा मार्ग आर्थिकदृष्टय़ा परवडणारा नाही, असा निष्कर्ष अभियांत्रिकी विभागाने काढला असून भुयारी मार्गातून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाण्याचे ठाणेकरांचे स्वप्न भंगल्यात जमा आहे.
महापालिका आयुक्त असताना आपल्या आक्रमक कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले आर. ए. राजीव यांनी ठाण्यात विकासाच्या अनेक नव्या प्रकल्पांची घोषणा केली. शहरातील दळणवळण व्यवस्थेला पर्याय म्हणून ट्रामगाडय़ांची घोषणा करून चर्चेत आलेले राजीव यांनी रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून वेगवेगळ्या मार्गाचा आराखडा तयार केला होता. दररोज लोकसंख्येचे नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या ठाणे शहरातील रहिवाशांना सध्या तरी उपनगरीय रेल्वेचा अवघा एकच पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी शहरातील वेगवेगळ्या मार्गावर दिसून येते. पुर्व द्रुतगती महामार्गावरील तीनहात नाका येथून गोखले मार्गाच्या दिशेने पुढे रेल्वे स्थानकाच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या बरीच मोठी आहे. ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी मध्यंतरी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार गोखले मार्ग तसेच तीनहात नाका परिसरातून स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा आकडा दररोज ५० हजारांच्या पुढे पोहोचला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाचा फारसा वाव राहिला नसल्यामुळे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दररोज मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र असते. ठाणेकरांसाठी लाइफ लाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोखले मार्गावर वाहनांच्या कोंडीमुळे प्रवासी अक्षरश: हैराण झाले आहेत. ठाणेकरांसाठी व्यावसायिक केंद्र असणाऱ्या या मार्गाचे रुंदीकरणाचे प्रयत्न फोल ठरल्यामुळे वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून तीनहात नाकापासून रेल्वे स्थानकाच्या दिशेने थेट भुयारी मार्ग काढण्याचा प्रस्ताव राजीव यांनी तयार केला होता.
घोषणा हवेतच..
रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना आणखी एक पर्याय उपलब्ध होईल, अशी राजीव यांची योजना होती. दोन वर्षांपुर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा उल्लेखही करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकल्पाचे ढोबळ नियोजन केले जावे, असे आदेश राजीव यांनी दिले होते. आपल्या प्रकल्पांसाठी राजीव भलतेच आग्रही असायचे. त्यामुळे अभियांत्रिकी विभागानेही या भुयारी प्रकल्पाच्या आराखडय़ावर काम सुरू केले. मात्र, राजीव यांची बदली होताच हा प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा सुसह्य़ नाही, असा स्पष्ट अहवाल अभियांत्रिकी विभागाने सादर केला आहे. गोखले मार्गाखालून असा एखादा मार्ग काढण्यासाठी मोठा खर्च करावा लागेल. तसेच त्यासाठी एमएमआरडीएसारख्या संस्थांची मदत घ्यावी लागेल. शहरातील उड्डाणपूल उभारण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा असताना भुयारी मार्गासारखा खर्चीक प्रकल्प अमलात आणणे सध्या तरी शक्य नाही, अशी माहिती अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा