ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा
सार्वजनिक उत्सव आणि सणासुदीच्या दिवसांत ध्वनिवर्धक आणि ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने शहरातील २६ ठिकाणे शांतता क्षेत्र (सायलेन्स झोन) म्हणून जाहीर केली आहेत. ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरांतील शांतता क्षेत्रांची घोषणा गुरुवारी सायंकाळी करण्यात आली. या परिसरात ध्वनीची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अहवालात शहरातील प्रमुख चौकांमधील प्रदूषणाची पातळी धोकादायक स्थितीपर्यंत पोहचल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सणासुदीच्या हंगामात तर ध्वनी पातळीच्या नियमांचे तीनतेरा होतात असा अनुभव आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी यासारखे सण ठाणे शहरात मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. या सणांच्या आयोजनात न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होत नाही, अशा तक्रारी पर्यावरणप्रेमींनी यापूर्वी वारंवार केल्या आहेत. विशेषत दहीहंडी उत्सवात चौकाचौकात या नियमांची पायमल्ली होत असते. पोलिसांकडून केवळ नावापुरते गुन्हे दाखल होत असल्याच्या तक्रारी आहेत. असे असताना महापालिका प्रशासनाने यंदा सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच शहरातील २६ ठिकाणे शांतता क्षेत्राच्या यादीत समावेश केला आहे. यामध्ये ठाण्यातील रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, रहिवासी संकुले यांचा समावेश आहे. सदर ठिकाणांभोवती १०० मीटर अंतरापर्यंत शांतता क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांकरिता ध्वनी मानकांच्या प्रयोजनासाठी औद्योगिक, व्यावसायिक, निवासी आणि शांतता क्षेत्र असे वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य शासनास आहे. त्यानुसार राज्य शासनाने पालिका क्षेत्रातील शांतता क्षेत्र अधिसूचित करण्याचे निर्देश दिल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. ध्वनिप्रदूषण २००० च्या अनुषंगाने मुख्य नियमांच्या नियम ३(२)अन्वये हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेने सांगितले. नागरिकांनी या सर्व ठिकाणी ध्वनी पातळीचे पालन करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
नौपाडय़ात अवघे एक क्षेत्र
शहरातील मुख्य रहदारीचा आणि दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या नौपाडा भागात अवघे एक शांतता क्षेत्र निश्चित करण्यात आले असून विविध रुग्णालयांनी व्याप्त असलेल्या गोखले मार्गावर असे कोणतेही बंधन टाकण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याच भागात काही राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवात मोठय़ा आवाजात अक्षरश धांगडिधगा सुरू असतो. याशिवाय ध्वनिप्रदूषणासंबंधी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कोपरी भागातही एकही शांतता क्षेत्र घोषित करण्यात आलेले नाही. महापालिकेच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या प्रदूषण अहवालात कोपरी भागात ध्वनिप्रदूषणाने टोक गाठल्याचे नमूद करण्यात आले होते.
घोषित शांतता क्षेत्रे
कामगार रुग्णालय वागळे इस्टेट (शांतता), बेथनी रुग्णालय पोखरण २ (औद्योगिक), वेदांत रुग्णालय ओवळा (रहिवासी), सफायर रुग्णालय कावेरी हाइट खारेगाव (रहिवासी), ज्युपिटर लाइफलाइन रुग्णालय पूर्व द्रुतगती महामार्ग (औद्योगिक), ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा (शांतता), जिल्हा सामान्य रुग्णालय उथळसर (शांतता), सेंट जॉन बाप्टिस्ट शाळा जांभळी नाका (शांतता), माजिवडा ग्रामीण शिक्षण संस्था शाळा माजिवडा (रहिवासी), ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालय परबवाडी (शांतता), एम.एच.मराठी शाळा शिवाजी पथ नौपाडा (शांतता), ज्ञानोदय माध्यमिक हिंदी विद्यालय सावरकर नगर (औद्योगिक), अल-नदी-उल-फलाह इंग्लिश स्कूल कौसा, मुंब्रा(रहिवासी), अब्दुल्ला पटेल शाळा नागसेननगर (रहिवासी), न्यू हॉरिझोन स्कॉलर्स स्कूल, कावेसर (शांतता), भारतरत्न इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, सावरकरनगर (शांतता), सेंट झेवियर्स इंग्लिश माध्यमिक विद्यालय, पातलीपाडा (रहिवासी), हिरानंदानी फाऊंडेशन शाळा हिरानंदानी इस्टेट (रहिवासी), लिटल फ्लॉवर इंग्लिश शाळा, वर्तकनगर (शांतता), वसंत विहार इंग्लिश हायस्कूल, वसंत विहार (शांतता), सिंघानिया शाळा पोखरण रोड १ (शांतता), डी.ए.व्ही. पब्लिक शाळा, तत्त्वज्ञान विद्यापीठ परिसर (शांतता), जन विकास संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, कळवा (शांतता), विद्या प्रसारक मंडळाचे जोशी-बेडेकर महाविद्यालय (शांतता), ठाणे महानगरपालिका शाळा क्र. ३१/४० शिमला पार्क (शांतता) आणि ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालय नाका (शांतता).