आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम करत आहोत, अशा थाटात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या ठाण्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना निकालाची आकडेवारी पाहून मोठा धक्का बसला असून, ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा यासारख्या विधानसभा मतदारसंघांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या या नेत्यांपुढे शिवसेनेला मिळालेली ही आघाडी कशी मोडून काढायची, असा प्रश्न उभा ठाकला आहे. शिवसेनेचे ठाणे संपर्कप्रमुख आमदार एकनाथ िशदे यांना आव्हान देत गेल्या वर्षभरापासून नारायण राणे समर्थक रवींद्र फाटक यांनी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच आनंद परांजपे यांच्यामुळे लोकसभेच्या तिकिटावर पाणी सोडावे लागल्यामुळे अस्वस्थ झालेले विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचा ठाणे शहर विधानसभा क्षेत्रावर डोळा असल्याची सुरुवातीपासून चर्चा आहे. विधानसभेची तयारी म्हणून डावखरे-फाटक या दोन्ही नेत्यांनी यंदा संजीव नाईक यांच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले होते. देशभरात आलेल्या मोदी लाटेने ठाण्यातील तीनही मतदारसंघांत आघाडीची अक्षरश: धुळधाण उडाल्याने डावखरे-फाटकांसह काँग्रेसच्या इच्छुकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात नवी मुंबई, मीरा-भाईंदर यासारख्या बालेकिल्ल्यांचा समावेश होत असल्याने राष्ट्रवादीचे संजीव नाईक यावेळी तोडीस तोड उमेदवार म्हणून ओळखले जात होते. शिवसेनेने या मतदारसंघातून राजन विचारे यांना उमेदवारी देऊनही प्रत्यक्ष प्रचारात वातावरणनिर्मिती करण्यात या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अखेपर्यंत यश आले नव्हते. मतदानाला जेमतेम चार दिवस शिल्लक असताना एकनाथ िशदे यांनी घेतलेल्या बैठकीत शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रचाराचे साहित्य मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. यावरून शिवसेनेची तयारी नेमकी कशी होती, याचा अंदाज बांधता येईल. एकीकडे शिवसेनेच्या गोटात सुंदोपसुंदी असताना संजीव नाईक यांनी मात्र प्रचारात्अतिशय चांगली बांधणी केली होती. आर्थिकदृष्टय़ा सक्षम असलेले नाईक सर्व ताकदीनिशी प्रचारात उतरल्याने विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या ठाण्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इच्छुकांनाही जोर चढला होता.
आयजीच्या जिवावर बायजी उदार
नाईक यांनी प्रचारात उतरवलेल्या ‘रसदे’चा आपल्या बांधणीसाठी पुरेपूर वापर करून घेण्याचा प्रयत्न या इच्छुकांनी केला. कोकणातील मतदारसंघात निसटता पराभव पदरी पडलेले नारायण राणे यांचे ठाण्यातील समर्थक रवींद्र फाटक यंदा कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. एकनाथ िशदे यांच्या या मतदारसंघात फाटक यांनी महापालिका निवडणुकीपासूनच बांधणी सुरू केली आहे. मध्यंतरी कोपरी येथे झालेल्या पोटनिवडणुकीतही त्यांनी सर्व ताकद पणाला लावली होती. या मतदारसंघात फाटक यांना मानणाऱ्या नगरसेवकांचा एक मोठा गट असून, संजीव नाईक यांच्या प्रचारात स्वत:ला झोकून देत त्यांनी विधानसभेची पूर्वतयारी चालविल्याचे चित्र होते. आनंद परांजपे यांच्यामुळे वसंत डावखरे यांचा कल्याणमधून उमेदवारीसाठी यंदा विचारच झाला नाही. त्यामुळे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असला, तरी ऐनवेळेस तो राष्ट्रवादीकडे खेचून आणण्याचे मनसुबे डावखरे समर्थक लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून बोलून दाखवत होते. ‘साहेब’ शहरातून लढणार असा दावाही त्यांचे समर्थक करताना दिसत होते. त्यामुळे नाईक यांच्या प्रचारात कधी नव्हे इतक्या ताकदीने यंदा निरंजन डावखरे सक्रिय झाल्याचे चित्र होते. ओवळा-माजिवडा मतदारसंघाची उमेदवारी आपल्यालाच मिळणार अशा आविर्भावात काँग्रेसचे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर, तर नाईकांना चिटकूनच असायचे. या सगळ्या नेत्यांचे डोळे निकालानंतर पांढरे होण्याची वेळ आली असून, ठाण्याच्या तीन विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेला मिळालेले एक लाख ८० हजारांचे मताधिक्य मोडून कसे काढायचे, असा प्रश्न या नेत्यांना पडला आहे. कोपरी-पाचपाखाडीत शिवसेनेला ६९ हजार, तर ठाणे शहरात सुमारे ६७ हजारांचे मताधिक्य मिळाले. ओवळा-माजिवडय़ात हा आकडा ५८ हजारांच्या घरात पोहचला आहे. त्यामुळे विचारे यांच्यानंतर रिक्त झालेल्या ठाणे शहर मतदारसंघातून उमेदवारीसाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू असताना आघाडीचे नेते मात्र अस्वस्थ बनले आहेत.
डावखरे-फाटकांच्या मनसुब्यांना धक्का
आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम करत आहोत, अशा थाटात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या ठाण्यातील काँग्रेस-
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-05-2014 at 06:44 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thanes top leaders in distress