औरंगाबाद तालुक्यातील गोलवाडी व बनेवाडी शिवारात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका बिबटय़ाने वासरावर हल्ला केला. दुपारी एक शेळीही त्याने मारली. शहराजवळच ही घटना घडल्याने घबराट पसरली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तथापि, जनावरावर केलेला हल्ला बिबटय़ाने केला होता की नाही, या विषयी शंका असल्याचे वनसंरक्षक ओ. एस. चंद्रमोरे यांनी सांगितले.
भरवस्तीत बिबटय़ा आला असेल तर त्याला पकडण्यासाठी नागपूर येथून मुख्य वनसंरक्षकाची परवानगी घ्यावी लागते. ती आल्यानंतर कारवाई केली जाईल, तोपर्यंत या भागात अधिकाऱ्यांना गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोलवाडी व बनेवाडी शिवारात रात्री ज्या वासरावर हल्ला केला, त्याची जखम पाहिल्यानंतर तो हल्ला बिबटय़ाने केला होता का, यावर शंका आहेत. तरीही या परिसरात गस्तीसाठी वन कर्मचारी नेमले आहेत. जिल्ह्य़ात यापूर्वी गंगापूर व पैठण तालुक्यात बिबटय़ाचा संचार असल्याची माहिती होती. काही ठिकाणी पिंजरेही लावले, पण वनखात्याला बिबटय़ाला पकडण्यात यश आले नाही. कर्णपुरी परिसरातील शेतात अनेकांना बिबटय़ा दिसल्याने घबराट पसरली. सोमवारी दुपारी शेळी राखणाऱ्या मुलाला बिबटय़ा दिसला होता. त्याची एक शेळी पळविल्यामुळे काही काळ तो बेशुद्धदेखील होता. तथापि, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी झालेला हल्ला बिबटय़ाचाच होता की नाही, अशी शंका घेतली.