१९९३ च्या दंगलीनंतर ‘सामना’मधून बाळासाहेबांनी लिहिलेल्या जळजळीत अग्रलेखांचे निमित्त होऊन ७ वर्षांनी, जुलै, २००० मध्ये बाळासाहेबांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात होती. बाळासाहेबांना अटक होणार हे कळताच कलानगरपाशी हजारो शिवसैनिकांनी धाव घेतली. मातोश्रीभोवतालचा परिसर संपूर्णपणे शिवसैनिकांनी भरून गेलेला.. अशातच बाळासाहेबांची गाडी बाहेर पडते.. त्यांच्या भावना अनावर होतात.. काही महिला शिवसैनिकांना भावना हुंदके आवरत नाहीत.. मात्र याचवेळी उद्धव ठाकरे गाडीतून उतरून सर्वाना शांत राहण्याची विनंती करतात. परंतु कोणीही ऐकत नाहीत. अखेरीस बाळासाहेब खाली उतरतात. खुणेनेच शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन करतात. मी स्वत:हून न्यायालयात जात आहे तेव्हा कृपया बाजूला व्हा.. सेनाप्रमुखांचे हे शब्द येताच रस्ता लगेच मोकळा होतो आणि गाडय़ांच ताफा हलतो..
सेनाप्रमुखांबरोबर तेव्हा गोपीनाथ मुंडे, तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु आदी नेते होते. मातोश्रीहून निघालेला हा ताफा थेट शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात पोहोचतो.. तेव्हा तेथेही जमलेल्या हजारो शिवसैनिकांकडून जयघोष होतो.. काही वेळातच अटकेचे सोपस्कार पूर्ण केले जातात.. त्यानंतर तेथून तो ताफा भोईवाडा न्यायालयाच्या दिशेने रवाना होतो.. त्याआधी पत्रकारांसमोर मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब म्हणतात.. अमरनाथ यात्रा वगैरे यात्रेप्रमाणे आमचीही जेल यात्रा काढली जाणे मला आवडणार नाही.. म्हणून आपण स्वत:हून आता न्यायालयाला सामोरे जात आहोत.. गेले काही दिवस मुंबईकर अनुभवत असलेला प्रचंड तणाव संपविण्याचे मी ठरवले आहे.
न्यायालयात कडक सुरक्षा व्यवस्था.. बाहेर शिवसैनिकांची तोबा गर्दी.. सेनाप्रमुखांच्या नावाचा सतत जयघोष.. खटल्याचे कामकाज सुरू होते.. थोडय़ातच वेळात बाळासाहेबांना जामीन होतो.. अन् या कथित जेलयात्रेची समाप्ती होते.. संपूर्ण मार्गात शिवसैनिकांचा जयघोष सुरूच राहतो..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा