तब्बल अकरा जणांचे सर्वसामान्य कुटुंब.. अनुदानित गॅसचा कोटा संपल्याने आता महागडा गॅस घ्यावा लागणार या चिंतेने या कुटुंबातील दोन सुनांनी सरपणाचा वापर करून गॅस वाचविण्याचा निर्णय घेतला.. सकाळपासूनच त्या सरपण गोळा करण्यासाठी घराबाहेर पडल्या.. सरपणाचा मोठा भारा जमल्याने आता चिंता मिटली, या आनंदातच त्या घराकडे परतू लागल्या.. पण, नियतीला काही वेगळेच करायचे होते. डोक्यावर सरपण घेऊन लोहमार्गावरून जात असताना एका एक्स्प्रेस गाडीने त्यांना धडक दिली अन् महागडय़ा गॅसच्या धास्तीतून पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या दोघींचा करुण अंत झाला..!
पुणे-मुंबई महार्गालगत सोमाटणे फाटय़ाजवळील शंकरवाडीत राहणाऱ्या मनीषा बिले व सुरेखा बिले अशी या दुर्दैवी सुनांची नावे आहेत. सख्ख्या जावांबरोबरच त्या सख्ख्या चुलत बहिणीही होत्या. ३ फेब्रुवारीला बेगडेवाडीजवळ ही घटना घडली. रेल्वेच्या धडकेने मृत्यू होण्याच्या अनेक घटनांपैकीच ही एक घटना असली, तरी कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून गॅसच्या नियोजनासाठी धडपडण्याच्या प्रयत्नात त्या दोघींना जीव गमवावा लागल्याची बाब समोर
आली आहे.
या दोघींच्या चांगल्या स्वभावामुळे प्रत्येकाशी चांगले संबंध होते. मनीषा यांना एक मुलगी व एक मुलगा असून पती गवंडी काम करतात, तर सुरेखा यांना दोन मुलगे असून, पती पानाची टपरी चालवितात. कुटुंबातील नियोजनाची सर्व जबाबदारी दोघी नेहमी हिरिरीने वाटून घेत होत्या. दोघींचे पती व मुलांबरोबरच या कुटुंबात सासू, नणंद व तिचा मुलगाही राहतो. अनुदानित गॅस सिलिंडरचा कोटा संपल्याने आता महागडा सिलिंडर घ्यावा लागणार, ही चिंताही त्या दोघींना होती. त्यामुळे अंघोळीसाठी पाणी तापविणे किंवा स्वयंपाकाच्या काही गोष्टी आता चुलीवर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
चुलीसाठी सरपण व गोवऱ्या आणण्याचे ठरविण्यात आले. रविवारी सकाळीच दोघी जावा, नणंद व तिचा मुलगा सरपण गोळा करण्यासाठी बाहेर पडले. तत्पूर्वी गावातील एका महिलेकडून गोवऱ्याही घेण्यासाठी मनीषा यांनी तिला काही रक्कमही दिली. लोहमार्गाच्या परिसरात वाळलेला लाकुडफाटा उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी जाण्याचे ठरविण्यात आले. मनीषा यांनी लगबगीने सरपण गोळा केले व एक भाराही घरी आणला. पण, हे सरपन पुरेसे नसल्याने सर्वजण पुन्हा बेगडेवाडी परिसरात गेले. दुपारी चारच्या सुमारास डोक्यावर लाकडाचा भारा घेऊन सर्वजण घरी परतत होते. दोन्ही जावांपासून काही अंतरावर नणंद व तिचा मुलगा चालत होते. लोहमार्गावरून जात असताना समोरून लोकल येत असल्याचे दिसल्याने त्या दोघी दुसऱ्या बाजूच्या मार्गावर आल्या. पण, तिथेच घात झाला. लाकडाच्या भाऱ्यामुळे दुसऱ्या मार्गावरून त्याच वेळी सुसाट येणारी एक्स्प्रेस गाडी त्यांना दिसली नाही अन् नणंद व तिच्या मुलाच्या डोळ्यादेखत या गाडीने त्या दोघींना उडविले.

Story img Loader