* प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी सोयीसुविधा देणार
* परिसर सुधारासाठी कंत्राटदाराची नियुक्ती
* अतिक्रमणे उठविणार
* पादचाऱ्यांच्या सोयीसाठी कठडे उभारणार
* दुचाकींसाठी वाहनतळ
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गावरील सेवा यावर्षीच सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात वसरेवा ते विमानतळ स्थानकावर फेऱ्या सुरू करण्याचे निश्चित झाल्यानंतर आता मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांसाठी मेट्रो स्थानकाभोवतीचा परिसर सज्ज करण्याच्या हालचाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरू केल्या आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबपर्यंत म्हणजेच दिवाळीपर्यंत मेट्रोच्या स्थानकांभवतीचा परिसर मोकळा करून तेथे प्रवाशांची ये-जा सुलभ व्हावी यासाठी सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो रेल्वे मार्गाची एकूण लांबी ११.४० किलोमीटर आहे. या मेट्रो मार्गावर वसरेवा, डी. एन. नगर, आझाद नगर, अंधेरी, पश्चिम द्रुतगती मार्ग, चकाला, एअरपोर्ट रोड, मरोळ नाका, साकीनाका, सुभाष नगर, असल्फा रोड आणि घाटकोपर अशी १२ स्थानके आहेत. मेट्रो रेल्वे सुरू व्हायची तर प्रवाशांसाठी स्थानकावर येण्यासाठी आणि तेथे उतरल्यावर बाहेर पडण्यासाठी मोकळी जागा आवश्यक आहे. सध्या बहुतांश मेट्रो स्थानकांच्या आसपासचा परिसर दाटीवाटीचा आहे. त्यामुळे मेट्रो स्थानक परिसर सुधारण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात येत आहे. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून जुलैच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत कंत्राटदारांची नियुक्ती होईल.
मेट्रोच्या स्थानकाभोवती प्रवाशांना रस्ता ओलांडण्याची वेळ येऊ नये व त्यातून परिसरात गर्दी, वाहतूक कोंडी होऊ नये असा मेट्रो स्थानक परिसर सुधार कार्यक्रमाचा हेतू आहे. त्याअंतर्गत मेट्रो स्थानकाकडे येण्यासाठी आणि तेथून बाहेर पडल्यावर जवळच्या रिक्षा स्टँडवर वा बस स्थानकापर्यंत जाण्यासाठी कठडे उभारून व्यवस्था केली जाणार आहे. मेट्रोच्या प्रवाशांना त्याचा उपयोग करून मेट्रोच्या स्थानकापर्यंत ये-जा करता येईल. त्यासाठी स्थानकांभोवती सध्या असलेली अतिक्रमणे काढणे, जागा मोकळी करणे आणि नेटकी रचना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शक्य तेथे दुचाकी वाहनांसाठी वाहनतळाची आखणीही करण्यात येणार आहे, असे ‘एमएमआरडीए’च्या वाहतूक विभागाचे मुख्य अभियंता पीआरके मूर्ती यांनी सांगितले. कार्यादेश दिल्यानंतर तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. येत्या दिवाळीपर्यंत निश्चितपणे हे काम संपेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.