साहित्यामध्ये समाजाबद्दल नुसती सहानुभूती अन् समाजाचं भलं एवढीच भूमिका योग्य नसून, त्यात वैचारिक सूर महत्त्वाचा आहे. स्वत:ला सतावणारे प्रश्न मांडणारा चांगला साहित्यिक असल्याचे मत व्यक्त करताना, चलनी नाण्यांप्रमाणे शब्दही गुळगुळीत होत चाललेत तरी लेखन ही लढाई आहे. ती सैनिकी शिस्तीने लढली पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाटककार प्रा. गो. पु. देशपांडे यांनी व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येथील वेणुताई चव्हाण सभागृहात आयोजित २३ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘उपरा’कार लक्ष्मण माने हे होते. तर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे, कार्यवाह गोविंद पाटील, आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ तबलावादक रमाकांत देवळेकर, साहित्यिक आनंद विंगकर (दोघेही कराड), ज्येष्ठ साहित्यिक कार्यकर्ते पंढरीनाथ शेवाळे (इस्लामपूर) आणि ज्येष्ठ लोककलावंत यशवंत भाऊ सूर्यवंशी (काळमवाडी) यांचा या वेळी यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रा. गो. पु. देशपांडे म्हणाले, की साहित्य संमेलनात आम्हा नाटककारांना कोणी विचारत नसताना यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित या संमेलनाचे उद्घाटक म्हणून मिळालेला मान निश्चितच समाधानाचा आहे. प्रबोधनकारांचे आपण देणं लागतो. तरी प्रबोधनकारांचे केवळ नाव घेऊन चालणार नाही. साहित्यिकांकडून समाजात काय, कसं चाललंय याचा विचार झाला पाहिजे.   
लक्ष्मण माने म्हणाले, की साहित्यात अमंगलाचा नाश आणि मंगलाचा उदय झाला पाहिजे, साहित्यिक कोणत्याही रंगाचा असला, तरी त्याची भूमिका, दृष्टी ही समाजाभिमुख असली पाहिजे. लिहिणाऱ्यांनी डोळे, कान उघडे ठेवून संवेदना जागवल्या पाहिजेत. लोकशाही हातातून गेल्याचे चित्र असले, तरी निराश न होता साहित्यिकांनी माती जागवली पाहिजे. ठरावीक एका वर्गाकडे इतका पैसा आलाय, की त्याविरुद्ध बंड सोडा ‘ब्र’ शब्द काढणे मुश्किल झाले आहे. मात्र, याविरुद्ध साहित्यिकांनी आवाज उठवावा असे आवाहन त्यांनी केले. समाज जाती, पाती पलिकडे जात नसल्याने इथे स्वातंत्र्य आणि लोकशाही आहे असे म्हणायचे का, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण यांच्या सोबतच्या माझ्या आठवणी लवकरच ग्रंथरूपाने आपल्यासमोर येणार असल्याचे सांगताना, यशवंतराव चव्हाण समाजमनाची समज असणारे नेते आणि विरोधकांशी कसे वागावे हे सांगणारे विद्यापीठ असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकात विजय चोरमारे म्हणाले, की दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा प्रवास ३० वर्षांचा असून, यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत स्थापना झाली असल्याने सभेला त्यांची प्रेरणा आहे. फुले, आंबेडकर, शाहूंचे विचार घेऊन काम करणारे हे व्यासपीठ आहे.
विलासराव पाटील-उंडाळकर, प्रा. उमा हिंगमिरे यांनी मनोगत व्यक्त केले. साहित्यिक रंगनाथ पठारे, अशोक नायगावकर, प्रा. चंद्रकुमार नलगे, वि. द. कदम आदी मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती.

Story img Loader