काही दिवसांपूर्वी स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळालेल्या उपराजधानीत विविध वस्त्यांमध्ये शौच्यविधी आटोपण्यासाठी किमान आठ हजारांवर लोक आजही उघडण्यावर बसत असल्याने ‘स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर’ या घोषवाक्याला दरुगधीचे ग्रहण लागले आहे.
नागपूर शहरात आणि परिसरात अनधिकृत ले आऊटची संख्या मोठय़ा प्रमाणात असून त्यातील अनेक ले आऊटस्वर या झोपडपट्टीधारकांनी कब्जा केला आहे. शिवाय रस्त्यावर भीक मागणारे किंवा ज्यांना काही आसरा नाही अशा अनेक गोरगरीब लोकांनी शहरातील विविध भागातील मोकळ्या जागेवर बस्तान मांडले असून ही मंडळी शौचालय नसल्यामुळे मोकळ्या जागेचा किंवा रस्त्याच्या कडेचा उपयोग करीत असतात. त्यामुळे काही भागात दुर्गधीचे प्रमाण वाढले आहे.
शहरातील अनेक झोपडपट्टीबहुल असलेल्या वस्त्यांमध्ये शौचालयाची व्यवस्था नाही. काही ठिकाणी शौचालये आहेत तर त्यांची अवस्था काही चांगली नाही. आठ-आठ दिवस त्याची सफाई केली जात नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या हद्दीत सात ते आठ हजार नागरिक दररोज सकाळी उघडय़ावर शौचास बसतात. ग्रामीण भागातील नागरिक मोकळ्या जागा, मैदानांचा वापर शौचास करतात. नागपूर शहरासारखे शहर देखील त्यात मागे नाही. महाराष्ट्राच्या उपराजधानीचे हे शहर ‘मिनी मेट्रो सिटी’च्या दिशेने वाटचाल करत आहे. आंतरराष्ट्रीय विमातळाला संलग्नित मिहान, सेझ येथे होऊ घातलेले आहे. परंतु, प्रात:विधी साठी येथील हजारो लोकांना उघडय़ावर जावे लागत आहे.
नागपूर शहरात साडेपाच लाखांच्या जवळपास घरे असून त्यापैकी आठ ते दहा हजार घरांमध्ये आजही शौचायलयाची व्यवस्था नसल्याची महिती मिळाली. त्यामुळे ही मंडळी शौचास जाण्यासाठी मैदान किंवा मोकळ्या जागांचा वापर करतात. महापालिकेतर्फे २४ वस्त्यांमध्ये सार्वजनिक शौचालये बांधण्यात येणार होती मात्र, त्यापैकी केवळ ४ ते ५ पूर्णत्वास आली आहेत. शहरात यशवंत स्टेडियम, टेकडी रोड, उमरेड रोड, वर्धा मार्ग, अमरावती मार्गावरील मोकळ्या जागेवर अनेक गोरगरीब लोकांनी झोपडय़ा उभारल्या आहेत, मात्र त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळे मिळेल त्या जागेवर लोक शौचास जाऊन घाण करीत असतात. उपराजधानीत ३२ ठिकाणी डोक्यावरून विष्ठा वाहून नेण्याचा प्रकार सुरू असल्याचा दावा नुकताच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने केला. महापालिकेच्या आरोग्य विभागाने हा दावा खोडून काढला असला तरी अनेक भागात आजही हा प्रकार सुरू असल्याचे सफाई कामगार संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. शहरातील विविध भागात आजही सकाळच्यावेळी अनेक लोक उघडय़ावर शौचास बसत असतात आणि त्या भागात जाऊन सफाई केली नाही तर त्यांना नोटीस दिली जात असल्याचे एका सफाई कामगाराने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा