तालुक्यातील वाडीवऱ्हे, लहांगेवाडी येथील आदिवासींची जमीन ताब्यात घेण्यासाठी तेथे असलेली घरे जेसीबीच्या सहाय्याने तोडून महिलांना मारहाण करणाऱ्या व जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या डॉक्टराविरूध्द अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी तालुक्यातील आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री आर. आर. पाटील व आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील लहांगेवाडी येथील आदिवासींच्या शेतजमिनीवर एका डॉक्टराने हक्क सांगत ही जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जमिनीवर असलेली आदिवासींची चार घरे जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करून महिलांना जातीवाचक शिवीगाळ करीत घराबाहेर काढले होते. या घटनेला दोन आठवडे झाल्यानंतरही पोलिसांनी संबंधित डॉक्टराविरूध्द कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप आदिवासींच्या शिष्टमंडळाने केला आहे. शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ यांची भेट घेऊन आदिवासींवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या डॉक्टराविरूध्द २० जुलैपर्यंत गुन्हा दाखल न केल्यास २२ जुलैपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे. शिष्टमंडळात पंचायत समिती सभापती रामदास घारे, वाडीवऱ्हेच्या सरपंच अनिता लहांगे, ज्येष्ठ नेते मधुकर लांडे, विष्णू खाडे, विष्णू आचारी आदिंचा समावेश होता.

Story img Loader