या शहरातील प्राचीन ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला, अंचलेश्वर मंदिर, बिरशाहा समाधी व परकोटाची दुरावस्था झालेली आहे. याची गंभीर दखल संस्कृती, पर्यटन व पुरातत्व विभागाने घेतली आहे.
शहरातील ऐतिहासिक स्थळांची आजची स्थिती अतिशय दयनीय असून याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. औद्योगिदृष्टय़ा प्रगत व प्रदूषित शहर, अशी ओळख असलेल्या या शहराची लोकसंख्या ४ लाखावर आहे. त्यामुळे शहरात मोठय़ा प्रमाणावर वसाहती दिसतात. त्यामुळे काही ऐतिहासिक स्थळे दिसेनाशी झाली आहेत. जी दिसत आहेत त्या स्थळांची स्थिती दयनीय आहे, तर काही ऐतिहासिक स्थळांमुळे शहरात समस्याही निर्माण होतांना दिसतात. अंचलेश्वर मंदिराची भिंत कोसळून वर्ष झाले, पण त्या भिंतीचे बांधकाम पुरातत्व विभागाने महिनाभरापूर्वी सुरू केले आहे. आतापर्यंत फक्त भिंतीचा पायाच उभा करण्यात आला असून या भिंतीचे काम संथगतीने सुरू आहे. या मंदिराची मागील भागातील भिंत पुरात पडली होती. मात्र, आता पुरातत्व विभागाला जाग आली आहे. बुलढाणा व जालना येथील दहा कामगार या भिंतीचे काम करीत आहेत. शहरातील इतर ऐतिहासिक स्थळांची पाहणी केल्यास असे दिसते की, शहरातील चार प्रवेशव्दारे व आठ खिडक्यांची अवस्था खस्ता झालेली आहे. शहरात प्रवेश करायचा असल्यास जटपुरा दरवाजाच्या वापर करण्यात येतो. हा मुख्य रस्ता असल्याने येथे वाहतुकीची कोंडी झालेली दिसते. जेथे जाण्याकरिता ५ मिनिटे लागतात तेथे या वाहतूक कोंडीमुळे अर्धा तास लागतो. मनपाचे तत्कालीन आयुक्त प्रकाश बोखड यांनी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या कार्यालयाला या प्रवेशव्दाराच्या दोन खिडक्या फोडण्याची परवानगी मागितली होती, परंतु प्रस्ताव धुळखात पडून असल्याने अजूनही परवानगी मिळालेली नाही.  अंचलेश्वर गेटमधून जाण्या-येण्याकरिता या दरवाज्याची भिंत तोडण्यात आली आहे. त्यामुळे या प्रवेशव्दारात वाहतुकीची तेवढी कोंडी होत नाही. बिनबा प्रवेशव्दारावर मोठय़ा प्रमाणात झाडे उगवली आहेत. काही ठिकाणी या प्रवेशव्दाराची भिंत पुराच्या पाण्याने कोसळली आहे, तर अनेक ठिकाणी भिंतीला भेगाही  पडल्या आहे. सोबतच हा दरवाजा एका बाजूने फारच पडक्या अवस्थेत आला आहे.
पठाणपुरा या दरवाजाकडे अतिशय घाण पसरलेली आहे, तर खिडक्यांची स्थितीही तशीच आहे. हनुमान खिडकी, विठोबा, बगड व चोर खिडकी, अशा चार खिडक्या असून त्याही जीर्णावस्थेत असलेल्या दिसते. खिडक्यांचा काही भाग खचलेला आहे, काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. खिडकीच्या बाजूच्या जागेवर नागरिकांनी आपले घरे बांधून अतिक्रमण केले आहे,. तर काही नागरिकांनी या खिडकीच्या भिंतीला लागूनच दुकानेही बांधलेली आहेत. किल्याच्या भिंतींना जाहिराती चिकटवलेल्या दिसतात. एकूणच या ऐतिहासिक स्थळांची स्थिती अतिशय वाईट झालेली आहे. इतर काही ऐतिहासिक स्थांचीदी अवस्था अशीच आहे. याकडे पुरातत्व विभागाने व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
ऐतिहासिक स्थळांच्या दुरुस्तीसाठी ३८ लाख
या ऐतिहासिक स्थळांच्या दुरावस्थेची माहिती खासदार हंसराज अहीर यांनी लोकसभेत मांडली व संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनाही याची कल्पना दिली. गोंडकालीन ऐतिहासिक शहरातील वास्तूंची दुरावस्था बघून त्याच्या दुरुस्तीकरिता ३८ लाखाचा निधी मंजूर केला आहे. चालू आर्थिक वर्षांत भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाचे सर्वेक्षणानुसार गोंडकालीन वास्तूंच्या संरक्षण व देखभालीसाठी गोंडराजा बिरशाह समाधी, चंद्रपूर गोंडकालीन किल्ल्याची भिंत (परकोट), महाकाली मंदिर, बल्लारपूर येथील गोंडकालीन किल्ला, अंचलेश्वर मंदिर, वैरागड येथील प्राचीन किल्ला, आरमोरी येथील प्राचीन मंदिराच्या दुरुस्तीसाठी ३८ लाखाचा निधी प्रस्तावित केला आहे.

Story img Loader